Rashmi Shukla Transfer: फोन टॅपिंगचे आरोप, पहिल्या महासंचालक, आता EC ने हटवलं, कोण आहेत रश्मी शुक्ला!
Rashmi Shukla Transfer: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका
मुंबई: काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांकडून करण्यात आलेल्या तक्रारी आणि पक्षपातीपणाच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना पदावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या ऐतिहासिक संघर्षावेळी विरोधकांचे फोन टॅप केल्याचा ठपका रश्मी शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर मविआ सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांची राज्याबाहेर बदली झाली होती.
मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच रश्मी शुक्ला यांची थेट पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात रश्मी शुक्ला या निष्पक्षपणे काम करणार नाहीत. त्यामुळे त्यांना पोलीस महासंचालकपदावरुन हटवण्यात यावे, अशी विरोधकांची मागणी होती. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य करत रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांचा उत्तराधिकारी कोण असणार, यासाठी 3 नावे सुचवण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
कोण आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. रश्मी शुक्ला यांनी भुगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 22 व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2005 रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये, जेव्हा तिची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यांदरम्यान त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2013 मध्ये, रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
Acting on the complaints from INC and other parties, Election Commission of India orders transfer of Rashmi Shukla, DGP Maharashtra with immediate effect with directions to Chief Secretary to hand over her charge to the next senior most IPS officer in the cadre. The Chief… pic.twitter.com/DqocropZo0
— ANI (@ANI) November 4, 2024
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात रश्मी शुक्ला आरोपी होत्या. त्याचीही चौकशी करण्यात आली. मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला होता. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप (Rashmi Shukla Phone Tapping Case) केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.
रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले, भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला होता.
आणखी वाचा