Sangli Lok Sabha: विशाल पाटलांनी सांगलीचं मैदान मारताच ठाकरेंविरोधातील खदखद बाहेर निघाली, विजयी मिरवणुकीत 'वाघ' नाचवले
Sangali Lok Sabha 2024 Result : सांगलीत विशाल पाटलांनी मैदान मारलं, त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणुकीत वाघाचे सॉफ्ट टॉय नाचवल्याचं पाहायला मिळालं.
Vishal Patil Won in Sangali Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जागावाटपावरुन जोरदार चुरस पाहायला मिळाली. अशातच महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेचा तिढा मात्र, यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला. ठाकरेंनी थेट चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसमधून (Congress) नाराजीचा सूर उमटू लागला. अनेक चर्चाविनिमयानंतर अखेर सांगलीची जागा ठाकरेंच्याच पारड्यात पडली. पण सांगलीतील इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी (Vishal Patil) बंड पुकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि घवघवीत यशही मिळवलं आणि ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, विजयानंतर विशाल पाटलांनी काँग्रेससोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
विशाल पाटलांच्या विजयानंतर सांगलीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांची भव्य मिरवणूक काढली. काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. विश्वजीत कदम, विशाल पाटलांकडून गुलालाची उधळण करण्यात आली. पण विशाल पाटलांच्या विजयी मिरवणुकीत चर्चा रंगलेली ती, वाघाच्या सॉफ्ट टॉयची.
कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणुकीत नाचवले सॉफ्ट टॉय
सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेल्या विशाल पाटलांची सांगलीत रात्री भव्य विजयी मिरवणूक निघाली. विश्वजीत कदम-विशाल पाटील गुलालात न्हाहून निघाले आहेत. पण या विजयी रॅलीत चर्चा होती ती, विजय रॅली दरम्यान विश्वजित-विशाल यांच्या समोर दाखवलेल्या वाघाच्या सॉफ्ट टॉयची. निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही सांगलीचे वाघ आहोत, असं वक्तव्य आमदार विश्वजित कदम यांनी केलं होतं. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी रॅलीच्या गाडीवर वाघांचे सॉफ्ट टॉय ठेवले होते.
सांगलीचं मैदान विशाल पाटलांनी मारलं
सांगली लोकसभेचं मैदान अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मारलं. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात, असा विश्वास निर्माण झाला आहे. तसेच, भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि विशाल पाटलांमध्ये खरी चुरस होती. यात जवळपास एक लाखांच्या मताधिक्यानं विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांना धूळ चारत त्यांचा पराभव केला. तसेच, मविआकडून रिंगणात असलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांचाही दारुण पराभव या निवडणुकीत झाला. त्यामुळे सांगलीत आता विशाल पाटलांच्या विजयाची जोरदार चर्चा आहे.
पाहा व्हिडीओ : Maharashtra Result 2024 Special Report : हिरो कोण? अपयशी कोण? महाराष्ट्रात बाप कोण?