Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोण कुठली जागा लढणार? अनिल परबांच्या विरोधात उमेदवार कोण?
Graduate And Teachers Constituency Election : राज्यातील विधानपरिषेच्या चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार असून 1 जुलै रोजी निकाल लागणार आहे.
![Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोण कुठली जागा लढणार? अनिल परबांच्या विरोधात उमेदवार कोण? Vidhan Parishad Election maha vikas aghadi vs mahayuti Graduate And Teachers Constituency Election anil parab vs eknath shinde leader bjp mumbai election Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोण कुठली जागा लढणार? अनिल परबांच्या विरोधात उमेदवार कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/939bcce74b64c17a86c0f4e5eddebb86167514653372383_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vidhan Parishad Election : मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासोबतच (Graduate And Teachers Constituency Election) कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 26 जून रोजी होणार आहेत. तर त्याची मतमोजणी 1 जुलैला होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने विरुद्ध महायुती अशी थेट लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. मुंबई पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
विधानपरिषदेच्या कोणत्या मतदारसंघात कोणाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे तसेच महाविकास आघाडी, महायुतीत कोणता पक्ष कुठली जागा लढवणार याची माहिती सविस्तरपणे पाहू,
मुंबई पदवीधर मतदारसंघ
मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये याआधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीकडून अद्याप उमेदवार जरी जाहीर केला नसला तरीही जागा शिवसेनेची असल्याने शिवसेना शिंदे गटाने उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. दुसरीकडे या जागेसाठी भाजपसुद्धा महायुती उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जातंय.
मुंबई शिक्षक मतदारसंघ
मुंबई शिक्षक मतदारसंघात या आधी शिक्षक भारतीचे कपिल पाटील हे आमदार होते. आता शिक्षक भारती कडून कपिल पाटील हे निवडणूक लढवणार नसून सुभाष मोरे यांना शिक्षक भारतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
महायुतीने मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यासंदर्भात निर्णय घेतला नसून महायुतीत उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. महायुतीची सुकाणू समिती या संदर्भात लवकरच निर्णय घेणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ
कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार होते. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा ही जागा भाजपकडूनच लढवली जाणार असून उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांच्याच नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र याच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षसुद्धा आग्रही असून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ
नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे हे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र आता या ठिकाणी नेमकं महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाला उमेदवारी देणार यावर दोन्हीही कडून चाचणी सुरू आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)