Vidhan Parishad Election : भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का? उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटे यांचा सवाल
Vinayak Mete : भाजपने विधानपरिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर केले असून त्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनांही डावललं आहे.
मुंबई : भाजपने आज विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या घटकपक्षांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसून आलं. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते नाराज आहेत. भाजपने आम्हाला काय फक्त वापरुन घेतलं का? असा सवाल विनायक मेटेंनी केला आहे. ते आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत.
राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे तसेच रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना डावलले आहे. त्यानंतर विनायक मेटेंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं काय असा सवाल त्यांनी केला आहे.
भाजपच्या यादीत त्यांचे 2014 पासून मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे नाव नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती. तसेच इतर निवडणुकीतही त्यांना वाटा मिळाला नसल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांनी या आधीही केली होती.
विनायक मेटे आज संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. आता दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.