(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UP Election 2022 : यूपीतील सहाव्या टप्प्यासाठी आज पंतप्रधानांसह दिग्गजांच्या होणार जाहीर सभा, पाहा कोणाची कुठे सभा?
येत्या 3 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा सहावा टप्पा पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करतायेत. आज या सहाव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत.
UP Election 2022 : आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे पाच टप्पे पार पडले आहेत. येत्या 3 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा सहावा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. सत्ताधारी भाजपसह विरोधक असणारे समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाने देखील मोठी प्रचारयंत्रणा राबवली आहे. सहाव्या टप्प्यात एकूण 57 जागांसाठी मतदान होणार असून, 676 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज या सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसह सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. आज कोणत्या नेत्याच्या कुठे सभा होणार आहेत, ते पाहुयात...
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
कोणत्या नेत्याची कुठे होणार सभा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यूपी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराजगंज आणि बलिया येथे जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 11.30 वाजता महाराजगंज जिल्ह्यातील कुशीनगर येथील फरेंडा, पनियारा, नौतनवा, सिसवान आणि महाराजगंज आणि रामकोला विधानसभा मतदारसंघासाठी संयुक्त रॅलीला संबोधित करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंज येथील आंबेडकर पदवी महाविद्यालयाच्या प्रागंणात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे. यानंतर, हेबतपूर, बलिया येथे दुपारी 2.50 वाजता जिल्ह्यातील बेलथरोड, रसरा, सिकंदरपूर, फेफना, बलिया, बनसडीह आणि बैरियाच्या या मतदारसंघासाठी पंतप्रधान जाहीर सभा घेणार आहेत.
अखिलेश यादव
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आज आंबेडकर नगर, बस्ती आणि संत कबीर नगरच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. आंबेडकरनगर जिल्ह्यात सकाळी 11:30 वाजता ते येणार आहेत. तिथेनू पुढे 4 वाजेपर्यंत त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. बस्ती जिल्ह्यात दुपारी 2:20 वाजता, तर संत कबीर नगर जिल्ह्यात 3:20 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.
प्रियांका गांधी
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशमधील काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता त्या बलिया येथे जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 12 वाजता त्या फेफणा येथे रोड शो करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता कुशीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा आणि दुपारी 3 वाजता रुद्रपूर, देवरिया येथे घरोघरी प्रचार करणार आहेत.
अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चार जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 12.15 वाजता त्यांचे संबोधन सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम कुशीनगरमध्ये, त्यानंतर दुपारी 1.45 वाजता संत कबीरनगरमध्ये, नंतर इटावामध्ये दुपारी 3 वाजता आणि नंतर बस्तीमध्ये 4.30 वाजता मेहदवाल विधानसभा होईल.
जेपी नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दुपारी 12 वाजता जौनपूर, त्यानंतर दुपारी 2.10 वाजता माझवान विधानसभा, मिर्झापूर आणि शेवटी 4.10 वाजता चकिया विधानसभा मतदारसंघासाठी चंदौली येथे त्यांची जाहीर सभा होमार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज 5 जाहीर सभा घेणार आहेत. सर्वप्रथम गोरखपूरमध्ये 11.05 मिनिटांनी त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता मुख्यमंत्री देवरिया येथील सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता देवरियामध्ये, 2.15 वाजता खजनी, 3.15 वाजता रुद्रपूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर 4.10 ते 6.10 या वेळेत गोरखपूर नगर परिसरात योगी आदित्यनाथ रोड शो करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा तिढा; आता 2 मार्च रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
- Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर; जाणून घ्या राज्यातील इंधनाचे दर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha