(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UP Election: शेतकरी नाराजीचा फटका भाजपला बसणार का? पश्चिम यूपीत कोण मारणार बाजी
पश्चिम उत्तर प्रदेशमधील 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये नेमकं कोण बाजी मारणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.
UP Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पहिल्या रणसंग्रामाला आजपासून सुरूवात झाली आहे. कारण आज उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधील 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये नेमकं कोण बाजी मारणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. 2017 चा विचार केला तर भाजपने या 58 जागांपैकी 53 जागांवर वर्चस्व राखलं होतं. मागच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला भरभरुन मतदान केले होते.
शेतकऱ्यांची भाजपवर नाराजी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पश्चिम यूपी हे भाजपसाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी पश्चिम यूपीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर आपली कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली होती. 2017 ते 2022 पर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणात बरेच बदल झाले आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्यांची भाजपवरील नाराजी. स्वतःला शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणणारे चौधरी कुटुंब यावेळी अखिलेश यादव यांच्यासोबत आहे. 58 जागांपैकी सुमारे 24 जागांवर जाट मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत या 24 जागांची स्थिती काय होती?
भाजपने 19 जागा जिंकल्या
बसपा - 2 जागा जिंकल्या
सपा विजयी - 2 जागा
आरएलडीला - 1 जागा
काल निवडणूक सुरू होण्यापूर्वीच शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून भाजपविरोधात रोष व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनीही भाजप सोडून कोणालाही मतदान करा असे वक्तव्य केले होते. त्यांच्या आवाहनाचा मतदारांवर किती परिणाम होणार हा येणारा काळच ठरवेल.
पश्चिम उत्तर प्रदेशात होणाऱ्या मतदानाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण शेतकरी आंदोलनाचा प्रभाव असलेल्या आज भागात मतदान होत आहे. पहिल्या फेरीचे मतदान यूपीच्या ऊस पट्ट्यात होत असून अखिलेश आणि जयंत यांची व्होट बँक मानल्या जाणाऱ्या जाट आणि मुस्लिम बहुल भागातही मतदान होत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीवर होणार परिणाम
उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा परिणाम 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर दिसून येणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे महत्त्व केवळ भाजपसाठी नाही तर अखिलेश-जयंत यांच्या जोडीचीही परीक्षा आहे. कारण यावेळी अखिलेश हे मुख्य चेहरा म्हणून मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मतदानाबाबत लोकांमध्ये विशेष उत्साह आहे. मतदानात महिला, पुरुष, तरुणांसह वृद्धही देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत. यूपीमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान झाले आहे.
आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान
आग्रा - 7.53 टक्के
अलीगढ - 8.26 टक्के
बागपत - 8.93 टक्के
बुलंदशहर - 7.51 टक्के
गौतम बुद्ध नगर - 8.33 टक्के
गाझियाबाद - 7.37 टक्के
हापूर - 8.20 टक्के
मथुरा - 8.30 टक्के
मेरठ - 8.44 टक्के
मुफ्फजनगर - 7.50 टक्के
शामली - 7.70 टक्के