दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द का झाला याबाबत मला माहिती नाही. दापोलीमधून उद्धव गटाचा उमेदवार बदलला जाऊ शकतो, असे योगेश कदम यांनी म्हटलं.
रत्नागिरी: कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पक्षफुटीनंतर येथील शिवसेनेतही दोन गट पडले आहेत. एकीकडे शिवेसना (Shivsena) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक, राजन साळवी यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाकरे गट कार्यरत आहे. दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम, विद्यमान मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदेंची शिवसेना सक्रीय आहे. त्यातच, आता शिंदेंच्या शिवसेनेत निलेश राणेंचा प्रवेश झाल्यामुळे कोकणातील राजकारण वेगळ्याच वळणावर गेलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी कोणताील उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्याच यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर झाली असून दापोली मतदारसंघातून संजय कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, संजय कदम यांची उमेदवारी बदलली जाईल, असा दाव शिवसेना युवा नेते योगेश कदम (Yogesh kadam) यांनी म्हटलं आहे. योगेश कदमांच्या या दावाने कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आदित्य ठाकरेंचा दौरा रद्द होण्यामागे हेच कारण असल्याचंही त्यांनी सूचवलंय.
माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द का झाला याबाबत मला माहिती नाही. दापोलीमधून उद्धव गटाचा उमेदवार बदलला जाऊ शकतो, असे योगेश कदम यांनी म्हटलं. संजय कदम यांनी केवळ उमेदवारी अर्ज भरलाय त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे दापोलीचे उमेदवार योगेश कदम यांनी केला आहे. 29 तारखेनंतर आदित्य ठाकरे दापोली दौऱ्यावरती येतील, त्यांच्या मनातल्या उमेदवाराला एबी फॉर्म देतील, अशी माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे, असा दावाच दापोलीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोकणला झुकते माप दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाले, असे टीका करणाऱ्यांना ही मोठी चपराक असल्याचंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. तसेच, कोकणातील जनता शिवसेनेसोबत आहे, हे 23 तारखेला पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, दापोलीतील निवडणूक तिरंगी होणार असून शिवसेना शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे अशी लढत आहे. मनसेच्या दापोली विधानसभेचा उमेदवार ठरला असून कुणबी समाजाच्या तरुण चेहऱ्या संधी देण्यात आली आहे. संतोष अबगुल यांना मनसेची उमेदवारी होणार जाहीर झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत प्रवेश केला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील जाहीर उमेदवार
दापोली – संजय कदम
गुहागर – भास्कर जाधव
रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर – राजन साळवी
कुडाळ – वैभव नाईक
सावंतवाडी – राजन तेली
कणकवली- संदेश भास्कर पारकर.
हेही वाचा
अजित पवार बारामतीत 75000 मतांनी मागे राहतील, विधानसभेनंतर ते संपतील, उत्तमराव जानकरांचा हल्लाबोल