(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभेसाठी रणनीती आणि विधान परिषदेसाठी मतांची जुळवा जुळव,'मविआ'च्या बैठकीत काय काय ठरलं?
Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं ? विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे.
2024 Maharashtra Legislative Assembly election : महाविकास आघाडीची मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये आज बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे हे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूक आणि 12 जुलै रोजी होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे.
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं ?
12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी, यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे. विधान परिषद सोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटप संदर्भात चर्चा सुरू केल्या जातील. जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत झाली.
विधानसभेची तयारी
लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एकप्रकारे भव्य सभा असेल, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे यश महाविकास आघाडीला प्राप्त झालं. त्यासंदर्भात मतदारांचा धन्यवाद दिले जाईल,आभार मानले जातील आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं... महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील या सगळ्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली.
जागावाटपाबाबत काय ठरलं?
महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष यांची जिल्हा जिल्हास्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे. महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही चांगलं यश मिळवू शकतो, हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे. जागावाटपसंदर्भातील बैठकांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार असून जागा वाटपाच्या सूत्रसंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ?
तिन्ही पक्षाची आज प्राथमिक औपचारिक बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लवकरच संयुक्त मेळावा मविआ घेणार आणि जनतेचे आभार मांडणार आहोत. जाहीरनामा निवडणूक प्रचार या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.