तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान; केसीआर, केटीआर आणि काँग्रेसमध्ये लढत, हैदराबादेत ओवैसींचा करिष्मा चालण्याची शक्यता
Telangana Election Voting: तेलंगणामध्ये आज (30 नोव्हेंबर) मतदान होत आहे. बीआरएसला सत्ता टिकवायची आहे, तर काँग्रेस पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे आणि भाजप पहिल्यांदाच सत्तेत बसण्याचा प्रयत्न करणार आहे.
Telangana Election 2023 LIVE Updates: तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Assembly Election) आज म्हणजेच, गुरुवारी (30 नोव्हेंबर) मतदान (Telangana Assembly Election Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. तेलंगणाच्या निवडणुकांसह (Telangana Election), या वर्षाच्या अखेरपर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत, ज्यांचा उल्लेख पुढच्या वर्षी (2024 मध्ये) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची (Lok Sabha Elections 2024) सेमीफायनल म्हणून केला जात आहे.
तेलंगणापूर्वी छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठी मतदान पार पडलं आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. तेलंगणात मुख्य लढत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात असल्याचं बोललं जात आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मतदानासाठी तेलंगणा सज्ज, ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त
राज्यभरात 35,655 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. तिथे एकूण 3.26 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. बुधवारी (29 नोव्हेंबर) अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत 106 मतदारसंघात आणि 13 डाव्या विचारसरणीच्या (एलडब्ल्यूई) प्रभावित मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी मतदानासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत बोलताना सांगितलं की, विधानसभा निवडणुकीसाठी अडीच लाखांहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तेलंगणात पहिल्यांदाच दिव्यांग मतदार आणि 80 वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
लोकशाहीचा उत्सव साजरा करा; पंतप्रधान मोदींचं तेलंगणातील मतदारांना आवाहन
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर ट्वीट करत तेलंगणातील मतदारांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, "मी तेलंगणातील माझ्या सर्व बांधवांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन करतोय. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आणि तरुण मतदारांना आग्रह आहे की, त्यांनी आपला मतदानाचा अधिकार नक्की बजवावा."
हैदराबादेत ओवैसींचा करिष्मा चालणार?
असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) 9 जागांवर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi), बीआरएस प्रमुख केसीआर (KCR) आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) या सर्व पक्षांच्या दिग्गजांनी तेलंगणात जोरदार प्रचार केला. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 2,290 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात सीएम केसीआर, त्यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजप लोकसभा सदस्य बी संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे.
सीएम केसीआर दोन जागांवरुन निवडणूक लढवतायत
बीआरएस नेते आणि मुख्यमंत्री केसीआर यावेळी गजवेल आणि कामरेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. सध्या केसीआर हे गजवेल मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपनं गजवेलमधून ई. राजेंद्र आणि कामरेड्डीमधून वेंकट रमण रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी काँग्रेसनं कामरेड्डीमधून आपले प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. रेवंत रेड्डी कोडंगल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील सत्ताधारी बीआरएसनं सर्वच्या सर्व 119 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजप स्वतः जागावाटप करारानुसार, 111 जागांवर निवडणूक लढवत आहे, उर्वरित आठ जागा अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेनेसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसनं आपल्या मित्रपक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) ला एक जागा दिली आहे आणि उर्वरित 118 जागांवर निवडणूक लढवत आहे.