उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा 'नॉटरिचेबल', मुख्यमंत्री शिंदेंची वनगा कुटुंबीयांशी चर्चा; विधानपरिषदेचं आश्वासन, पत्नीची माहिती
Srinivas Vanaga Not Reacheble : मुख्यमंत्री शिंदेंनी श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबाशी चर्चा करुन विधानपरिषदेचं आश्वासन दिलं असल्याची माहिती श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीनं दिली आहे.
Srinivas Vanaga Not Reacheble : शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Eknath Shinde Group) असलेले पालघरचे (Palghar) विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) नॉटरिचेबल झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) पालघरमधून माजी खासदार राजेंद्र गावितांना (Rajendra Gavit) उमेदवारी देताच, शिंदेसमर्थक आमदार श्रीनिवास वनगा नाराज झाले असून त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आठवण झाली. शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांपैकी केवळ वनगा यांचंच तिकीट कापलं आहे. त्यामुळं श्रीनिवास वनगा मानसिक तणावाखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबाशी चर्चा करुन विधानपरिषदेचं आश्वासन दिलं असल्याची माहिती श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीनं दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघरमधून माजी खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिंदेसमर्थक आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची आठवण झाली. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, उद्धव ठाकरे यांनीच श्रीनिवास वनगा यांना आमदारकी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंडात आमदार वनगा यांनी शिंदेंना साथ दिली होती. पण त्याच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांपैकी केवळ वनगा यांचंच तिकीट कापलं आहे. त्यामुळं श्रीनिवास वनगा मानसिक तणावाखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, याच तणावातून टोकाचं पाऊल उचलण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल, मुख्यमंत्र्यांकडून विधानपरिषदेचं आश्वासन
पालघरमधून भाजपनं राजेंद्र गावितांना उमेदवारी देताच, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या श्रीनिवास वनगांना अचानक उद्धव ठाकरेंची आठवण झाली. खासदार वडील चिंतामण वनगांच्या निधनानंतर, उद्धव ठाकरेंनीच श्रीनिवास वनगा यांना आमदारकी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी शिंदेंनी केलेल्या बंडावेळी, वानगांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आपलं काहीतरी चांगलं होईल ही आशा त्यांना होती. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 'हातचं सोडून पळत्याच्या पाठीस लागणं' या म्हणीचा प्रत्यय वनगांना आला आहे. थेट आमदारकीच्या स्पर्धेतूनच एकनाथ शिंदेंनी वगळल्यानं, श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले आहेत. आमच्या प्रामाणिकपणाचं हेच का फळ? असा सवाल विचारणाऱ्या वनगांच्या मनात सध्या आत्महत्येचा विचार घोंघावू लागल्याचं त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगतिलं होतं. पण सध्या श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पत्नीशी फोनवरुन संवाद साधत त्यांना विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले
श्रीनिवास वनगा यांना यावेळी शिंदे गटाने पालघरची उमेदवारी नाकारली आहे. ही बाब श्रीनिवास वनगा यांच्या मनाला लागली आहे. हीच नाराजी व्यक्त करताना श्रीनिवास वनगा यांना रडू आवरलं नाही. श्रीनिवास वनगा आणि त्यांची पत्नी कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले. तसेच, श्रीनिवास वनगा आत्महत्या करतील, अशा भीतीनं त्यांची आई व्याकूळ झाली आहे.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून वनगा कुटुंबीयांच्या भेटीला
श्रीनिवास वनगा हे रडत असल्याच्या बातम्या आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहिल्या आणि त्यानंतर आम्हाला त्यांची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पाठवलं असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसई जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वीच वनगा कुटुंबीयांची भेट घेतली. श्रीनिवास वनगा हे घरी नसले तरी त्यांच्या पत्नीशी चर्चा करत त्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्याचा आमचा प्रयत्न असून उद्धव ठाकरे हे आमचे आजही कुटुंब प्रमुख असल्यानं त्यांना आपण उभ्या केलेल्या आमदाराला असं रडताना पाहून रहावलं नसल्यानंच त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं असल्याची प्रतिक्रिया पंकज देशमुख यांनी दिली आहे.
डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनीही घेतली वनगा कुटुंबियांची भेट
उबाठाच्या पदाधिकाऱ्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले वनगा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आमदार विनोद निकोले यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे काही पदाधिकारीही उपस्थित आहे. आमदार निकोले यांचा वनगा यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. वनगा कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न आमदार निकोले यांनी केला आहे.