एक्स्प्लोर
पवारांचा प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडा, मंत्री सुभाष देशमुख संतापले
भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने सुभाष देशमुख चांगलेच संतापले. पवारांचा प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडावी, अशा शब्दात मंत्री सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री विजय देशमुखांचं नाव न घेता टीका केली आहे.
पंढरपूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने सुभाष देशमुख चांगलेच संतापले. पवारांचा प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडावी, अशा शब्दात मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि पालकमंत्री विजय देशमुखांचं नाव न घेता टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपमधील गटबाजी समोर आली. माढ्यामधून शरद पवार आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याने सोलापूर जिल्हा भाजपासाठी आव्हान बनलेलं असताना या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
आज पंढरपूरमध्ये दोन लोकसभा जागांसाठी झालेल्या पक्षाच्या बैठकीकडे पक्षाच्या महासचिव सरोज पांडे यांनीदेखील पाठ फिरवल्याने पदाधिकारी देखील अस्वस्थ झाले आहेत. आजच्या क्लस्टर बैठकीसाठी जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते येतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. या महत्वाच्या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, खा. अमर साबळे आणि आ. सुजितसिंग ठाकूर यांच्याशिवाय कोणताच मोठा नेता फिरकला नाही.
या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या सहकारमंत्र्यांनी थेट पालकमंत्री गटातील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. भाजपमध्ये आलेल्या पवारप्रेमींना जर त्यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेल्या पदांचे राजीनामे द्यावे लागतील असे ते म्हणाले. पालकमंत्री विजय देशमुख यांच्यावर ही जबाबदारी नसल्याने ते आले नाहीत तर खासदार संसदेच्या अधिवेशनात असल्याचे तोकडे समर्थन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी करून वेळ मारून नेली.
माढ्यामधून पवार निवडणूक लढविणार हे खरे असले तरी या वयात पवारांना कार्यकर्त्यांनी त्रास द्यायला नको होता, असे सांगत राज्यातील जनतेच्या आग्रहामुळे पवार माढ्यातून उभारतील असा दावाही देशमुख यांनी केला. पवार आणि शिंदे यांच्याविरोधात भाजप निवडणूक लढवणार असून आमचा उमेदवार कमळ असेल, असे सांगत उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर भाजपमध्ये सहकारमंत्री आणि पालकमंत्री असे दोन गट असून यांच्यातील गटबाजी नेहमीच समोर येत आली आहे. राष्ट्रवादीमधून आलेल्या तरुण तुर्कांच्या मदतीने पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद, सोलापूर बाजार समिती अशा अनेक ठिकाणी सत्ता मिळवली आहे. यातील जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे पवारांवरील प्रेम लपून राहिलेले नाही. आता खुद्द शरद पवार हेच माढा लोकसभेच्या जागेवर उमेदवार होणार असल्याने भाजपकडून पुन्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच निवडणूक लढवावी लागणार असल्याचेही बोलले जात आहे. अशावेळी पालकमंत्र्यांच्या गटाकडून मदत मिळणार नसल्याने ज्यांना पवारांचा प्रचार करायचा आहे त्यांनी भाजपमुळे मिळालेली आपली पदे सोडावीत असा इशारा सुभाष देशमुख यांनी भाजपमधील पवारप्रेमींना दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement