एक्स्प्लोर
Advertisement
मध्य सोलापूर विधानसभा | प्रणिती शिंदे हॅटट्रिक करणार की विजयापासून 'वंचित' राहणार?
वंचितचा उमेदवार जितका प्रभावी असेल तितकीच प्रणिती शिंदे यांची डोकेदुखी वाढणार हे नक्की. एकीकडे भाजप आणि वंचितच्या उमेदवारांविरुद्ध लढण्याची तयारी करत असताना पक्षातील स्वकीयांच्या बंडाला देखील आमदार प्रणिती शिंदे यांना सामोरं जावं लागणार आहे.
सोलापूर : लोकसभेच्या मागील निवडणुकांप्रमाणे यंदाही काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. याच पराभूत उमेदवारांच्या यादीमध्ये एक मोठं नावं होतं ते केंद्रीय गृहमंत्री राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांचं. मोदी लाटेत 2014 च्या निवडणुकीत नवख्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा पराभव केला. आपल्या राजकीय कारकिर्दीतील शेवटची निवडणूक अशी भावनिक साद देत शिंदे यांनी 2019 ची निवडणूक लढवली. मात्र याही निवडणुकीत शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या राजकीय कारर्किदीची सद्दी अशा प्रकारे संपेल असं कोणी विचारही केला नसेल. आता सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठीही यंदाची निवडणूक ही प्रचंड अवघड असणार असंच चित्र सध्या दिसतंय.
आमदार प्रणिती शिंदे यांची राजकीय जीवनाची सुरुवात 2009 च्या निवडणुकांपासून झाली. त्या आधी प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचारमंचाच्या माध्यमातून सामाजिक काम करत आपली ओळख निर्माण केली होती. प्रणिती शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा फायदा त्यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकांत झाला आणि तत्कालीन आमदार आणि माकपचे मातब्बर नेते नरसय्या आडम यांचा पराभव करत प्रणितींनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 च्या मोदी लाटेतही प्रणिती शिंदे यांनी आपला विजय कायम राखला आणि दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली.
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ हा अनिश्चित राहिला आहे. मतदार संघात मोठ्याप्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे. जवळ-जवळ एक लाख मतदार मुस्लीम समाजातील आहे. त्याखालोखाल दलित, तेलगु भाषिक समाजाचाही मोठ्या प्रमाणावर या विधानसभा मतदान संघात संख्या आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वात मोठा कामगार वर्ग या मतदार संघात राहतो. तर सर्वात जास्त झोपडपट्ट्या ही याच मतदारसंघात आहेत. विडी कामगारांची लक्षणीय संख्या आणि त्यांच्या हक्कांसाठी माकपने घेतलेली भूमिका यामुळे कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या सीपीआयएमला देखील या मतदारसंघातून विधानसभेत नेतृत्वाची संधी मिळाली. तत्कालीन आमदारांचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसला नवं नेतृत्व मध्य मतदारसंघातून दिलं आहे.
आडम मास्तर
2014 निवडणुकीत एमआएमचा प्रंचड मोठा परिणाम या मतदार संघात जाणवला. एमआयएमचे तौफीक शेख यांनी प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज दिली. यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विजयापेक्षा तौफीक शेख यांच्या पराभवाचे चर्चा अधिक रंगल्या. यंदाच्या विधानसभेत एमआयएमसोबत प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएमच्या उमेदवाराकडून चांगल्या लढाईची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र एमआयएमचा एकमात्र चेहरा असलेले तौफीक शेख यांच्यावर खुनाचा खटला दाखल झाल्याने ऐन निवडणुका तोंडावर आल्यानंतर तौफीक यांना तुरुंगात जावं लागलं आहे. त्यामुळे वंचिततर्फे उमेदवार कोण असेल हा ही मोठा प्रश्न आहे. तर भाजपकडे आजही म्हणावा तसा चेहरा नाहीये.
तौफिक शेख
2014 च्या निवडणुकात एमआयएमने केलेली प्रभावी कामगिरीमुळे यंदाच्या निवडणूक प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोपी नसणार असं चित्र निर्माण झालंच होतं मात्र तौफीक शेख यांच्या अटकेमुळे प्रणिती शिंदे यांच्या मार्गातील विघ्न थोडेसे कमी झाले आहेत. तौफीक शेख यांच्यानंतर एमआयएमतर्फे निवडणूक लढवण्यासाठी ही भाऊगर्दी होताना दिसत आहे. 2014 च्या विधानसभेत अक्कलकोट मतदारसंघातून मनसेतर्फे निवडणूक लढविलेले फारुख शाब्दी आणि सोलापूर शहरात मुस्लिम समाजात सामाजिक कार्य करणारे इम्तियाज पिरजादे हे वंचिततर्फे इच्छुक असल्याचं बोललं जातंय. वंचितचा उमेदवार जितका प्रभावी असेल तितकीच प्रणिती शिंदे यांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.
एकीकडे भाजप आणि वंचितच्या उमेदवारांविरुद्ध लढण्याची तयारी करत असताना पक्षातील स्वकीयांच्या बंडाला देखील आमदार प्रणिती शिंदे यांना सामोरं जावं लागणार आहे. आतापर्यंत काँग्रेसची हक्काची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या मुस्लीम आणि मोची समाजाने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. मुस्लिम आणि मोची या दोन्ही समाजांनी उमेदवारीवर आपला हक्क सांगितला आहे. मतदारांच्या संख्या लक्षात घेता या समाजातील नेतृत्वाला संधी मिळाली नाही. म्हणून यंदाच्या निवडणुकीमध्ये संधी देण्यात यावी अशी या समाजाची मागणी आहे. प्रणिती शिंदे यांनी मोहोळच्या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी भूमिका या समाजातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
मोहिनी पत्की
लोकसभेत सोलापूर मतदारसंघात डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवले. सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर मध्य विधानसभेत तरी मताधिक्य मिळेल अशी आशा होता. मात्र भाजपने याही मतदारसंघात मुसंडी मारली. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसला हा मतदारसंघ पसंती देईल का? हा ही मोठा प्रश्न आहे. मात्र भाजप शिवसेनेकडे या मतदारसंघात म्हणावा तसा उमेदवार नाही. 2014 च्या विधानसभेत भाजपतर्फे मोहिनी पत्की यांना उमेदवारी देण्यात आली होती. अल्पसंख्याक मतदारांची संख्या प्रचंड असताना देखील मोहिनी पत्की यांना 23 हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांनाही 33 हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. यंदाच्या विधानसभेत भाजप-सेना युती झाल्यास भाजप-सेनेच्या उमेदवार ही निवडून येण्याची शक्यता आहे. त्यात वंचितचा थेट फटका काँग्रेसला बसेल त्यामुळे यंदाची निवडणूक ही प्रणिती शिंदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
महेश कोठे
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या
पुरुष - 147751
महिला - 144512
इतर - 10
एकूण - 292273
2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
प्रणिती शिंदे, काँग्रेस - 46907
तौफिक शेख, एमआयएम – 37138
महेश कोठे, शिवसेना – 33334
मोहिनी पत्की, भाजप – 23319
2019 च्या लोकसभेत मध्य विधानसभेतून उमेदवारांना मिळालेली मतं
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप - 80823
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस - 49994
प्रकाश आंबेडकर, वंचित - 27468
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement