Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Amit Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाला आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही. पण, यावर्षी दीपोत्सव साजरा करत असताना आचारसंहिता लागली आहे
मुंबई : राजधानी मुंबईत शिवसेना आणि मनसे वाद नवा नाही, मात्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहेत. मनसेच्यावतीने (MNS) घेण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप शिवसेना युबीटी पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे यांच्याकडूनच ही आचारसंहिता भंग झाल्याचे शिवसेना युबीटी उमेदवार आणि अमित ठाकरेंचे (Amit Thackeray) महेश सावंत म्हटले आहे. तसेच, याबाबत निवडणूक आयोगाने कारवाई करून दीपोत्सवाचा खर्च मनसेच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणीही शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाला तक्रारी पत्रही दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाला आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही. पण, यावर्षी दीपोत्सव साजरा करत असताना आचारसंहिता लागली आहे, असं असताना याच दिपोत्सवात मनसे पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार होत आहे, आणि ते नियमबाह्य आहे, त्याला आमचा आक्षेप आहे, असे शिवसेना युबीटी पक्षाचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
दीपोत्सवाच्या निमित्ताने तीनशे-चारशे कंदील आपल्याला पूर्ण शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळतात, यावर मनसेचे चिन्ह आहे, त्याशिवाय काही ठिकाणी बॅनर्सही लावलेले आहेत. माध्यमांनी सुद्धा अमित ठाकरे तिथे उपस्थित असल्याचे दाखवलं, याचा अर्थ त्या ठिकाणी पूर्णपणे प्रचार या दीपोत्सवाच्या माध्यमातून होत आहे, असच दिसून येते. त्यामुळे त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये या दीपोत्सवाचा खर्च अंतर्भूत करावा ही आमची आता मागणी आहे, असेही महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने म्हटले आहे. निवडणूक लागल्यानंतर कुठेही सार्वजनिक ठिकाणी महापालिका अधिकारी परवानगी देत नसताना शिवाजी पार्क मैदानावर अधिकाऱ्यांनी दीपोत्सवाला परवानगी कशी दिली ?, असा सवालही महेश सावंत यांनी विचारला आहे. त्यामुळे, मनसेचा दीपोत्सव आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, निवडणूक आयोग शिवसेनेच्या या तक्रारींवर नेमकी काय भूमिका घेते हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या अनिल देसाई यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सचिव अनिल देसाई यांच्याकडे तक्रार दिली आहे. छत्रपती शिवाजी पार्क,दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत देखील तक्रार करण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची खासदार अनिल देसाई यांनी भेट घेत निवेदन सादर केलं.
हेही वाचा
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती