अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज सादर करतेवेळी प्रतिज्ञापत्र जोडले होते
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांकडून अर्ज भरण्यात येत आहे. या अर्जासोबतच उमेदवार आपल्या संपत्तीचं विवरणही प्रतिज्ञापत्रात देत आहेत. त्यामुळे, उमेदवारांच्या संपत्तीची एकूण माहिती समोर येत असून गत निवडणुकीत आमदारकीची किंवा खासदारीची निवडणूक लढवली असल्यास, गत 5 वर्षांत संबंधित नेत्याच्या खात्यात किंवा संपत्तीत किती वाढ झालीय, याची देखील माहिती समोर ये आहेत. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघातून त्यांनी आपला अर्ज दाखल केल्याने येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. कारण, येथून ठाकरेंच्या शिवसेनेकडून नरेश मनेरा यांना मैदानात उतरवण्यात आला आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे. विशेष म्हणजे गत 5 वर्षांत प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज सादर करतेवेळी प्रतिज्ञापत्र जोडले होते. तेव्हा, त्यांची एकूण संपत्ती 143 कोटी 97 लाख 18 हजार 745 एवढी होती. त्यानंतर, आता यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 271 कोटी 18 लाख 39 हजार 647 रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. म्हणजेच, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत साधारण 128 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
प्रताप सरनाईक यांची एकूण संपत्ती -
2024 मधील संपत्ती
रोख रक्कम - ८,१७,९६२
पत्नीकडे - १६,४४,६०६
जंगम - ५६,३०,९७,२८३
पत्नीकडे - ४४,३८,५५,४६६
स्थावर - २१४,९७,४२,३६४
पत्नीकडे - १७६,६०,००००
कर्ज - १९४,४३,२३,७०९
पत्नीकडे - ५५,६०,८४,९६
शेअर्स - १०,४०,०००
सोने - २२,५०,०००
संपत्तीच्या घोळाप्रकरणी ईडीकडून कारवाई
दरम्यान, यापूर्वी प्रताप सरनाईक यांच्या बेकायदेशीर संपत्तीप्रकरणी ईडीने कारवाई केली होती. 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी ईडीनं चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचं निष्पन्न झालं होतं. जवळपास 13000 गुंतवणुकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी थकबाकी रुपयांची थकबाकी असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं होतं. आस्था ग्रुपनं सन 2012-13 या कालावधीत 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी दिले. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीनं दिली होती.