ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात,भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं खळबळजनक वक्तव्य, भाजप- शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता
भाजप उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे.
Maharashtra Vidhansabha Election 2024 : उल्हासनगर विधानसभेमध्ये (Ulhasnagar Assembly) महायुतीमध्ये कुरबुर असल्याचे उघड झाले आहे. भाजप उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं शिंदे गटामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आता कोण गद्दार राहिला नाही, ज्यांना गद्दार बोलले जातात ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यावर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पडदा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र उल्हासनगर विधानसभेतील विद्यमान आमदार तथा भाजप उमेदवार कुमार आयलानी यांना या वक्तव्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता
उल्हासनगरमध्ये भाजप मेळाव्यात आमदार कुमार आयलानीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंद आणि यांनी भाषण केले. भाषणात ते म्हणाले की, आता कोण गद्दार राहिला नाही, ज्यांना गद्दार बोलले जातात ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. ज्यांनी गद्दारी केली होती, ते आमच्या पक्षात आले आहेत. त्यांना आम्ही खुद्दार म्हणणार असं देखील रामचंदानी म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या या खळबळजनक विधानाने मोठा गोंधळ उडाला आहे. या विधानामुळे उल्हासनगर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काय पवित्रा घेतात ते पहावं लागेल. तसेच या वक्तव्यानंतर जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी सांगितले की माझ्या बोलण्याच्या वेगळा अर्थ काढला गेला आहे.
समज गैरसमज बाजूला ठेवून काम करा, मंत्री रविद्र चव्हाण याचं आवाहन
मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. प्रदीप रामचंदानी यांनी काय स्टेटमेंट केले आहे हे मला माहिती नाही. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र उल्हासनगरमध्ये असलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती आहे. समज गैरसमज बाजूला ठेवून सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. महायुतीतला प्रत्येक उमेदवार कसा जिंकेल हे आपल्या सगळ्यांना 20 तारखेपर्यंत करायचे आहे असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: