Sharad Pawar : गद्दारांचं काय? भाषण सुरू असतानाच शरद पवारांना चिठ्ठी; पवार म्हणाले, गद्दारांना पाडा, पाडा पाडा
Sharad Pawar Wai Speech : वाईमध्ये शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ या निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आमदार मकरंद पाटील हे उमेदवार आहेत.
सातारा : गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांबद्दल कडक भूमिका घेतल्याचं दिसतंय. वळसे पाटलांना गद्दार म्हणून त्यांना पाडण्याचं आवाहन केल्यानंतर आता इतर ठिकाणीही तशीच भूमिका घेतली जात आहे. वाईतल्या भर सभेत शरद पवारांना चिठ्ठी आली आणि गद्दारांचं काय अशी विचारणा झाली. ती चिठ्ठी दाखवत शरद पवार म्हणाले, गद्दारांना पाडा, पाडा पाडा. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी वाईमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पिसाळ यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.
शरद पवार भाषण करत असताना त्यांच्याकडे प्रेक्षकातून एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी पवारांनी वाचली. गद्दारांचं काय असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता. त्याचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले की, गद्दारांचं काय अशा प्रश्न विचारण्यात आला आहे. गद्दारांना पाडा, पाडा, पाडा.
मुली बेपत्ता होत आहेत, स्त्रियांवर अत्याचार वाढतोय
राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "आज महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून प्रश्न सुटत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेचे मला आभार मानायचे आहेत. लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर भाजपच्या लक्षात आले आणि मग त्यांनी काही निर्णय घेतले. लाडकी बहीण त्याचाच भाग. आमच्या मनात हीच शंका आहे की मध्यप्रदेश प्रमाणे हा सुद्धा निर्णय मागे पडेल. स्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातून अनेक मुली गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत. लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा तुम्ही अशी ठेवता? महिलांच्या सन्मानाबाबत आम्ही कधीही तडजोड केली नाही."
त्याचवेळी वाईतील लोकांच्या भावना समजल्या होत्या
लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार वाईमध्ये गेले होते. आमदार मकरंद पाटील यांच्या कुटुंबातील लग्नासाठी ते उपस्थित राहिले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, "मी मकरंद पाटील यांच्या घरातील लग्नात गेलो. सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मी उशीरा आलो. त्यावेळी मोठमोठ्या टाळ्या आणि घोषणा होत होत्या. त्याचवेळी मला वाईतील लोकांची भावना समजली होती. आताच्या सभेला जागा बसायला जागा नाही. लोक म्हणतात आमचं ठरलंय."