Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
Sharad Pawar: मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. तुम्हाला जो राजकीय पक्ष आणि व्यक्ती योग्य वाटेल, त्यांना मतदान करा.
बारामती: अजित पवार हे चौथ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांच्याकडे सत्ता आहे. मग तरीही त्यांच्यावर अन्याय झाला, असे कसे म्हणता येईल, असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा फेटाळून लावला.
अजित पवार चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्याकडे आता सत्ताही आहे. युगेंद्र पवार हा तरुण मुलगा आहे. त्यांच्याकडे काही नाही. मग त्यांच्यावर अन्याय कसा झाला?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांना बारामतीच्या जनतेने चौथ्यांदा संसदेत पाठवले, याबद्दल मला समाधान आहे. यावर पत्रकारांनी तुम्ही सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद दिले नाही,त्यांच्यावर अन्याय केला, अशीही चर्चा रंगल्याचे शरद पवारांना सांगितले. मग तुम्ही इतके दिवस 'लाडका पुतण्या योजना' राबवत होतात का, असा प्रश्नही शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार दिलखुलासपणे हसले.
यावेळी शरद पवार यांनी महायुतीला राज्यात 175 जागा मिळतील, या अजित पवारांच्या दाव्याची खिल्लीही उडवली. खरंतरं अजित पवार यांनी महायुतीला 270 ते 280 जागा मिळतील, असं सांगायला पाहिजे होते. एवढ्या कमी जागा सांगणं चुकीचं आहे, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली.
महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अपेक्षित, मविआला बहुमत मिळेल, असं चित्र दिसतंय: शरद पवार
शरद पवार यांनी मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल, असे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे शरद पवार यांनी सांगितले. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. लोकसभेला महाराष्ट्रात 65 टक्के मतदान झाले. पण ईशान्येकडली राज्यात 75 ते 80 टक्के मतदान झाले. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; शरद पवार म्हणाले, मी त्यांना थोडसं ओळखतो, माझ्याकडे...
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'