Sharad Pawar: विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; शरद पवार म्हणाले, मी त्यांना थोडसं ओळखतो, माझ्याकडे...
Sharad Pawar On Vinod Tawade: विरार-नालासोपारामधील कॅश प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar On Vinod Tawade: नालासोपारा येथील विवांता हॉटेल रूमवर बेकायदा रोकड सापडल्याने, तसेच मतदारसंघात बेकायदा प्रवेश करून पत्रकार परिषद घेतल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर तुळींज पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नालासोपारा येथे पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला. 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती, असा दावा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला.
विरार-नालासोपारामधील कॅश ड्रामावरुन काल दिवसभर राजकारण तापल्याचं दिसून आलं. तसेच विरोधकांनी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. तर विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली. सदर प्रकरणावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
सदर प्रकरणाबाबत फॅक्चुअल नक्की माहिती नाही. त्यामुळे मी लगेच त्यावर भाष्य करणार नाही. ज्यांच्यावर आरोप केला जातो, त्यांना मी थोडसं ओळखतो. माझ्याकडे ऑथेटिंक माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात- शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी राज्यातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात आहे, असं शरद पवार म्हणाले. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. तुम्हाला जो राजकीय पक्ष आणि व्यक्ती योग्य वाटेल, त्यांना मतदान करा. पण मतदान जरुर करा, असे शरद पवार यांनी सांगितले.
हितेंद्र ठाकूर यांचं आवाहन-
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे उमेदवार आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपारा आमदार तथा उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी आपल्यासह परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. विरार पश्चिम जिल्हा परिषद नेहरू हिंदी शाळेत आज ठाकूर कुटुंबीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी आपल्या आवडीच्या उमेदवारास मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे अहवान हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
संबंधित बातमी:
Vinod Tawade: विरारच्या विवांता हॉटेलमधील विनोद तावडेंचा आणखी एक व्हिडीओ समोर; पोलिसांना म्हणाले...