Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
Shara Pawar: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवारांनी त्यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आहे.
पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेत आणि उत्कंठा वाढवणारी निवडणूक म्हणजे बारामतीची निवडणूक होय. कारण, लोकसभा निवडणुकीत ननंद विरुद्ध भावजय असा सामना झाल्यानंतर आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या लढत होत आहे. शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध थेट त्यांचा पुतण्याच शरद पवारांनी मैदानात उतरवला आहे. त्यावरुन, अजित पवारांनीही बारामतीमध्ये भाषण करताना भावनिक होऊन घर फुटल्याचं बोललं होतं. मात्र, अजित पवारांविरुद्ध शरद पवारांनी जोरदार फिल्डींग लावल्याचं दिसून येत आहे. कारण, शरद पवारांनी आज बारामतीमध्ये चंद्रराव तावरे यांची भेट घेतली. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण चंद्रराव तावरे हे सध्या भाजपात आहेत, पण त्यांनी अजित पवारांमुळेच शरद पवारांची साथ सोडली होती. त्यामुळे, या भेटीला बारामतीच्या राजकारणात मोठं महत्त्व आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवारांनी त्यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आहे. राज्यातील आणि विशेषत: बारामतीमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. बारामती तालुक्यातील सांगवी गावात चंद्रराव तावरे यांच्या राहत्या घरी शरद पवारांनी ही भेट घेतली. यावेळी उमेदवार युगेंद्र पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रराव तावरे सध्या आजारी आहेत, त्यामुळे ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चंद्रराव हे शरद पवारांचे जुने सहकारी मात्र 1997 ला अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकांवेळी चंद्रराव तावरे यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवारांनी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे, शरद पवारांनी आपल्या पुतण्याविरुद्ध चांगलाच शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे. कारण, नातू युगेंद्र पवार यांना सोबत घेऊन शरद पवारांनी तावरेंची भेट घेतली. चंद्रराव तावरे हे सध्या भाजपमध्ये आहेत. परंतु, आजपर्यंत तावरे आणि अजित पवारांचा संघर्ष झाला त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते.
आमच्या काही लोकांनी उद्योग केला - शरद पवार
युगेंद्र पवार यांचा अर्ज भरल्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले, मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. सत्ता नाही, म्हणून सहकारी आहेत त्यांची साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि पहाटे शपथ घेतली. राज्यपाल यांना उठवले, कशासाठी?, असा मिश्किल टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना लगावला. अनेक पद दिली, अनेकांना मंत्री केलं. सुप्रियाला एक पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. घर एक ठेवण्याचे काम केलं. चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?, घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ