माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची लढत
माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अभिजीत पाटील यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
सोलापूर : लोकसभेला मोठा ट्विस्ट आणि राजकीय घमासान घडलेल्या माढा (Madha) मतदारसंघात विधानसभा निवडणुकांमध्येही शेवटपर्यंत उत्सुकता ताणून राहिली आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती, दुसरीकडे विद्यमान आमदार बबन शिंदे हेही स्वत:च्या पुत्रासाठी आग्रही होते. त्यामुळे, येथील मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे व अभिजीत पाटील या दोघांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना अखेर राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. शरद पवारांनी माढ्यात धक्कातंत्र देत यंदा साखर कारखानदार अभिजीत पाटील (Abhijit patil) यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांवेळी अभिजीत पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी कारखान्यावर मेळावा घेत महायुतीचे काम केले होते. तरीही, शरद पवारांनी (Shard pawar) त्यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, माढ्यात आता महायुतीचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अभिजीत पाटील यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवारांच्या पाठिमागे असेलल्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर अभिजीत पाटलांनी उमेदवारी मिळवण्यात मात केल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याहस्ते अभिजीत पाटील यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला आहे.
रणजीत शिंदे अपक्ष लढणार - बबन शिंदे
एबीपी माझाशी बोलताना माढ्यातील विद्यमान आमदार बबन शिंदे म्हणाले की, आपले आता वय 75 झाले असून तब्येतही साथ देत नसल्याने रणजीत भैय्याला रिंगणात अपक्ष उतरवत आहे. गेल्या निवडणुकीत मी 70,000 मतांनी निवडून आलो होतो यावेळी भैय्याला त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून माढ्याची जनता विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला. शरद पवारांकडून उमेदवारीसाठी ज्या पद्धतीने त्रास झाला, याबाबत विचारलं असता पवारांची काहीतरी अडचण असेल. मात्र त्यांचे माझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत बबन शिंदे यांनी विषय संपवला.
हेही वाचा
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार