हिंजवडीत साखर कारखान्याचा नारळ फोडला पण तिथं आयटी पार्क उभं राहिलं, 5 लाख लोकांना रोजगार मिळाला, शरद पवारांनी सांगितला जुना किस्सा
Sharad Pawar, पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणी मागील इतिहास सांगितला आहे, ते भोसरी येथे बोलत होते.
Sharad Pawar, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणी मागील इतिहास सांगितला आहे.
शरद पवार काय काय म्हणाले ?
शरद पवार म्हणाले, "माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता होती. राज्याच्या मुख्यमंत्री होतो, मला आठवतंय. एक दिवशी आमचे नवले नावाचे सहकारी आले. त्यांनी मला सांगितलं की, इथं आम्हाला साखर कारखाना काढायचा आहे. त्यासाठी कुठं असं मी त्यांना विचारलं. ते म्हणाले हिंजवडी....हिंजवडीत साखर कारखाना काढायचं त्यांनी ठरवलं. मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण देण्यात आलं. माझ्या डोक्यात दुसरा विचार होता. मी जगातील काही देशांमध्ये पाहिला होता. मी नवलेंचं निमंत्रण स्वीकारलं. कार्यक्रमाला गेलो. साखर कारखान्याचा पायाभरणीचा नारळ फोडला. माझ्या भाषणामध्ये सांगितलं की, मी नारळ फोडलाय पण इथं कारखाना होणार नाही. लोक म्हणाले हे आले कारखान्याच्या भूमीपूजनाला...भूमीपूजन केलं. आता म्हणतात कारखाना होणार नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी तुम्हाला इथून तीस मैलांवर जागा देतो. ही हिंजवडीची जागा मला हवी आहे. मला या ठिकाणी आयटी कंपनी आणायची आहे. आयटी पार्क करायचं आहे. मला आज आनंद आहे, तिथे आज हजारो लोक काम करतात. अर्थकारण बदलय, कोट्यावधी रुपयांची निर्यात होते. अनेक जण अमेरिकेत बसतात, त्यांचं ऑफिस हिंजवडीला आहे. आज सगळ्यामुळे हिंजवडीचं अर्थकारण बदललं. तुम्ही लोकांनी कष्ट केले, त्यामुळेच हा बदल होऊ शकला".
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आज आपण बघतोय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये राज्याची सत्ता घेण्यासाठी काही पाऊलं टाकलेली आहेत. ते काय सांगायचे आधी? ते आम्हाला सांगतात की, आमच्या हातात सत्ता पाहिजे. कशासाठी सत्ता? त्यांना हवं तसं राज्य करायचंय. हळूहळू भाजपाची शक्ती वाढवायची आहे, हळूहळू देशाचे प्रधानमंत्री या देशाच्या ऐक्याच्या संदर्भात वेगळी पाऊलं टाकताहेत त्यांची ताकद वाढवायची आहे. याला आवर घालायचा असेल तर महाराष्ट्राची सत्ता भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात द्यायची नाही, हा निकाल घेण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. ते करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी आपण श्रीमती चारोस्कर यांना आपल्या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही विजयी केलं पाहिजे.
इतर महत्त्वाच्या बातम्या