राज ठाकरेंना सरकारसोबत घेण्याविषयी फडणवीसांचं सूचक वक्तव्य, शिंदे गटातील नेत्यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले
Shambhuraj Desai : राज ठाकरेंना सरकारसोबत घेण्याविषयी फडणवीसांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडून ही प्रतिक्रिया उमटत असताना शंभूराज देसाई यांनी देखील बोलकी प्रतिकिया दिली आहे.
Shambhuraj Desai मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीसह राज्यातील इतर अनेक दिग्गज नेत्यांना दारुण पराभवाला समोर जावे लागले. अशातच विधानसभा निवडणुकीत 128 जागांवर उमेदवार उभे करुनही एकाही जागेवरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय न मिळाल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षाची मोठी वाताहत झाल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान या विषयी भाष्य करताना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या अभिनंदनाचे आणि विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी 'सह्याद्री' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
त्यासाठी त्यांना सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारावे लागेल-शंभूराज देसाई
दरम्यान, या वक्तव्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडून ही प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी बोलकी प्रतिकिया दिली आहे. जर कोणत्या घटक पक्षाला सोबत घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मिळून घेतील. यासाठी त्यांना सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारावे लागेल. त्यामुळे जर राज ठाकरे महायुतीत घ्यायचे असेल तर हे तीन प्रमुख नेतेच ठरवतील, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
.... तर हा त्यांचा निर्णय असू शकतो- उदय सामंत
दुसरीकडे भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्या युतीसंदर्भात उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, हा त्यांचा निर्णय असू शकतो, देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेशी देखील चर्चा करतील, असं उदय सामंत म्हणाले. मंत्रिपदाचं वाटप कसं होणार हे शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. महायुतीबाबत तीन नेते एकत्र बसून निर्णय घेतील. असे ते म्हणाले.
राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणे-संजय राऊत
दरम्यान याच मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करत राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणे असल्याची टीका केली आहे. राज ठाकरेंना भाजप खेळवत ठेवतेय. मुंबईत मराठी बोलायची नाही, अशी शक्ती केली जाते आहे. त्यामुळे आम्ही ही हे सगळे पाहत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा