Satara Election : सातारा जिल्ह्यात लोकसभेच्या तुलनेत सर्व मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, कोणत्या मतदारसंघात काय घडलं?
Satara District Election Update : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण हे मतदारसंघ सातारा लोकसभा तर फलटण अन् माण माढा मतदारसंघात येतात.
सातारा : सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान राहिलं आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. फलटण, वाई, कोरेगाव,माण, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा या मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघांचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात होतो. तर, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतात. सातारा जिल्ह्यातील 8 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तुलना केली असता साताऱ्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किती मतदान झालं?
फलटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेला माढा मतदारसंघात येतो. फलटणमध्ये विधानसभेला 241376 मतदान झालं आहे. तर, लोकसभा निवडणुकीत 225304 एवढं मतदान झालं होतं. माण विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदानात वाढ झाली आहे. माण विधानसभा मतदारसंघात लोकसभेला 215390 मतदान झालं तर विधानसभा निवडणुकीत 259603 मतदान झालं आहे. हे दोन्ही मतदारसंघ माढा विधानसभा मतदारसंघात येतात. दोन्ही मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती. फलटणला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार गोरे भाजपकडून लढत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाकर घार्गे यांचं आव्हान आहे.
वाई ते सातारा सर्व मतदारसंघात मतदान वाढलं
वाई विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी लोकसभेला 207869 इतकं मतदान झालं होतं तर विधानसभा निवडणुकीत 234544 इतकं मतदान झालं आहे. वाईची लढत तिरंगी झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील रिंगणात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून पुरुषोत्तम जाधव रिंगणात आहेत. लोकसभेला इथून शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळाली होती.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभेला 211680 मतदान झालं होतं. विधानसभा निवडणुकीत इथं मतांची टक्केवारी वाढलेली आहे. कोरेगावात 249311 इतकं मतदान झालं आहे. इथं शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं आव्हान आहे. लोकसभेला या ठिकाणी उदयनराजे भोसलेंना आघाडी होती.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेला 194029 इतकं मतदान झालं होतं.विधानसभा निवडणुकीत या जागेवर देखील मतदान वाढलेलं आहे. कराड उत्तरमध्ये 288830 इतकं मतदान झालं आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या मनोज घोरपडे यांचं आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांना लोकसभेला इथून आघाडी मिळाली होती.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते अतुल भोसले यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे. यापूर्वी दोनवेळा पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसले यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारंसघात 240743 इतकं मतदान झालं आहे. लोकसभेला 198633 इतकं मतदान झालं होतं.
पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. पाटणमध्ये शिवसेनेकडून शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हर्षद कदम आणि अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर रिंगणात आहेत. विधानसभेला इथं 229483 मतदान झालं आहे. या ठिकाणी लोकसभेला 170618 इतकं मतदान झालं होतं.
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम विधानसभेच्या रिंगणात आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात थोडी वाढ झाली आहे. लोकसभेला 210658 इतकं मतदान झालं होतं. तर विधानसभेला 217700 इतकं मतदान झालं आहे. लोकसभेला उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिण, कोरेगाव आणि सातारा विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. तर, शशिकांत शिंदे यांना वाई, कराड उत्तर आणि पाटणमधून आघाडी मिळाली होती.
इतर बातम्या :