"जयश्री ताई तुमसे बैर नही, सुधीर दादा गाडगीळ अब तुम्हारी खैर नही"; सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी विजयाचा विश्वास, तर बंडखोरांना इशारा
Sangali Election : सांगली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी पक्ष उमेदवार असलेल्या जयश्री पाटील आपली मोठी बहिण आहे, असं पृथ्वीराज पाटील म्हणाले आहेत.
Sangali Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार शुभारंभ पार सांगलीतील मारुती चौकात पार पडला. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ सोहळा पार पडला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली विधानसभेत झालेल्या बंडखोरीवर आणि भाजपवर भाषणातून भाष्य केलं.
सांगली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी पक्ष उमेदवार असलेल्या जयश्री पाटील आपली मोठी बहिण आहे, असं म्हणत "जयश्री ताई तुमसे बैर नाही, सुधीर दादा गाडगीळ अब तुम्हारी खैर नही" या शेरच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी सुधीर घाडगे यांना एक प्रकारे इशारा दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली असली, तरी ताकदीनं निवडणूक लढवण्याचा इरादा या प्रचार शुभारंभच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांना पराभव करुन विधानसभेत जाणार म्हणजे जाणार असे छातीठोकपणे सांगितलं. तसेच, मला एकदा आमदारकीची संधी द्या, सांगलीचा आमदार कसा असतो? हे दाखवून देतो, असं म्हणत पृथ्वीराज पाटील यांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना आव्हान दिलं आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांना दिलेलं मत हे भाजपलाच मत दिल्यासारखं होईल, त्यामुळे काँग्रेसलाच मतदान करा असं आवाहन काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी मतदारांना केलं आहे.
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि आमदार विश्वजीत कदम यांनी महायुती सरकारमध्ये भविष्यात दोन मुख्यमंत्री करतील, त्यांचा काही नेम नाही, असं म्हणत महायुतीवर टीका केली. तसेच, सांगली लोकसभेत अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटलांचं काम केलं आणि त्यांना खासदार म्हणून निवडून आणलं यांची प्रथमच जाहीरपणे कबुली दिली. सांगली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसमधल्या बंडखोरीवर कदम यांनी भाष्य केलं आहे. सांगली विधानसभेचा उमेदवारीचा प्रश्न सुटला असता तर मनापासून आनंद झाला असता. जयश्री वहिनी या सरळ मार्गी आणि भोळ्या आहेत, पण जयश्री वहिनींना कोणीतरी फितवलं. आता ते कोणी फितवलं, हे ज्या दिवशी मला कळेल त्यादिवशी त्यांची काही खैर नाही, असं म्हणत जयश्री पाटील यांच्या बंडखोरी मागे असणाऱ्यांना विश्वजीत कदम यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे. जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला, पण त्यांना नेमका कसला दबाव आला हे माहीत नाही. यामुळे खासदार विशाल पाटील त्यांच्या कोंडीत सापडले आहेत. पण आज शेवटी जे सांगली विधानसभेत घडायला नको होतं, तेच घडलं. सांगली जिल्ह्याला भाजप पक्षानं मागे नेलं आहे, अशीही टीका विश्वजीत कदम यांनी भाजपवर केली आहे.