अकलूजच्या 'शिवरत्नवर' खलबतं! रामराजे निंबाळकरांसह जयंत पाटील उपस्थित; मोहिते पाटील डाव टाकणार का?
अकलूजमध्ये आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकापचे जयंत पाटील दाखल झाले आहेत.
Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची (Madha Loksabha ) रणधुमाळी सुरु झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केलीय. माढा लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत येतोय. कारण येथून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हेदेखील इच्छुक होते, परंतू त्यांना भाजपनं डावलले आहे. त्यानंतर मोहिते पाटलांच्या हालचालींना वेग आलाय. रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. याच पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकापचे जयंत पाटील दाखल झाले आहेत.
अकलूजमध्ये 'या' नेत्यांची उपस्थिती
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकरांसह शेकापचे जयंत पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा डीसीसी सेवाई चेअरमन अनिल देसाई यांच्यासह शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख यांच्यासह शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष प्रवीण गायकवाड
हे उपस्थित आहेत. अकलूजमध्ये सध्या राजकीय खलबतं सुरु आहेत. भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक होते, परंतू त्यांना भाजपनं डावलले आहे. त्यामुळं मोहिते पाटील आता काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मोहिते पाटील अपक्ष लढणार की तुतारी हाती घेणार?
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते-पाटील घराण्याला राज्याच्या राजकारणात मोठे स्थान आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या घराण्यानं राजकारणात विविध पदांवर काम केलंय. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोहिते पाटील यांचा गट सक्रिय आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मोहिते पाटील यांचे गावोगावचे कार्यकर्ते उमेदवारी मिळणार म्हणून कामाला देखील लागले होते. पण अखेर रणजितसिंह निंबाळकरांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटलांची कोंडी झालीय. त्यामुळं मोहिते पाटील बंडखोरी करत पवारांच्या पाठिंब्यानं हाती तुतारी घेणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. पण दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे देखील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं शरद पवार कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजेंसह मोहिते पाटलांचा होता विरोध
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील विरोध केला होता. मोहिती पाटील आण निंबाळकर यांच्यातही खटके उडले होते. त्यामुळं निंबाळकरांच्या विरोधात हे नेते आहेत. तरीदेखील निंबाळकरांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिलीय. त्यामुळं मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी अशी विनंती मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून होतेय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरसमधून रणजितसिंह निंबाळकरांना मोहिते पाटलांनी 1 लाखाहून अधिक मतांचे लीड दिले होते. त्यामुळं या मतदारसंघाच मोहिते पाटलांची ताकद आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
इतिहासाची पुनरावृत्ती होणार? माढ्यात 'कमळानं' डावललं, मोहिते पाटील हाती 'तुतारी' घेणार का?