Rajya Sabha Election: उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार; संजय पवारांचा विश्वास, तर संजय राऊत म्हणाले...
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मुंबई: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करेन, मिळालेल्या संधीचं सोनं करेन असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती हे आमचे दैवत आहेत, मी संभाजीराजेंना भेटणार आहे असंही ते म्हणाले. तर शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
संजय पवार म्हणाले की, जो विश्वास पक्षप्रमुखांनी दाखवलेला आहे तो सार्थ ठरवेन, छत्रपती हे आमचे दैवत आहेत, मी संभाजीराजेंना भेटणार आहे. चर्चेत नाव असणं आणि नाव फायनल होणे यात खूप फरक आहे. मी पण मराठा आहे, समाजाच्या प्रत्येक आंदेलनात मी होतो. भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी माझे लक सुरु आहे, महाविकास आघाडी सरकार या शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणेल.
संजय राऊत म्हणाले की, मी खात्रीने सांगू शकतो, या वेळेला शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार राज्यसभेवर जातील याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल असतील आणि ते 31 तारखेला अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचा उमेदवार ठरल्यानंतर परंपरेनुसार अर्ज भरेल. पण महाविकास आघाडी एक आहे, आम्ही सगळे सहा जागांपैकी आमच्या चार जागा निश्चित निवडून आणू.
संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपने तिसरी जागा द्यावी किंवा चौथी द्यावी, आम्ही आमच्या जागा निवडून आणू. अशाप्रकारे ईडी, सीबीआयच्या धाडी पाडून जर जागा जिंकता येत असतील तर त्यांनी प्रयत्न करत राहावे. या देशात लोकशाही आहे आणि आम्हाला पूर्ण अधिकार आहे आमच्या जागा लढण्याचा. शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही. या सर्व कारवाया ज्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर सुरू आहेत त्या केवळ राजकीय सूडबुद्धीने होत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे, देशाच्या जनतेला माहित आहे काय चालले आहे त., पण हा काळ निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्रं आमच्याकडे असतील.