(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha : चर्चा निष्फळ, शिवसेना-भाजप लढत अटळ; सहावी जागा भाजपच जिंकणार, चंद्रकांत पाटील यांचा दावा
BJP Chandrakant Patil : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप अशी लढत होणार आहे.
मुंबई: राज्यसभेच्या उमेदवारी माघार घेण्याची मुदत संपली असून आता शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यसभेची सहावी जागा ही भाजपच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आज महाविकास आघाडीचे नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस आणि आपली भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यसभेचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली, त्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपला देण्यात येईल असा प्रस्तावही त्यांनी ठेवला."
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, "आमच्याकडे सध्या 30 मतं आहे, इतरही 12 मतं भाजपला मिळणार आहेत. त्यामुळे भाजपच ही जागा जिंकेल. त्यामुळे आम्हीच महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला होता की शिवसेनेने त्यांची दुसरा उमेदवार मागे घ्यावा, त्या बदल्यात आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढवणार नाही. पण 11.30 वाजल्यानंतर त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे निवडणूक अटळ आहे. भाजपकडे आवश्यक संख्याबळ आहे. "
राज्यसभेसाठी शिवसेना आणि भाजप लढत
राज्यसभेसाठी कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने आता शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही बाजूंकडून आपणच जिंकणार असल्याचा दावा केला जातोय.
संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटींची होणार असल्याचे म्हटले जात आहे.