पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वात प्रथम उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यामध्ये, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच, पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur) मतदारसंघात आज राज ठाकरेंची तोफ धडाडली. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गेल्या 2 दिवसांपासून विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांना सुरुवात केली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणातून ते सत्ताधारी व विरोधकांवर हल्लाबोल करत असून आपल्या हाती सत्ता देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. महाराष्ट्र हे वैभवसंपन्न राज्य आहे, म्हणूनच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचाय, त्यासाठी माझ्या हाती सत्ता द्या, असे आवाहन राज ठाकरेंकडून होत आहे. पंढरपूर येथील सभेत बोलताना राज ठाकरेंनी मिश्कील टोला लगावला. महाराष्ट्र समृद्ध आणि प्रगत करणं, सर्वकाही करणं शक्य असल्याचं राज यांनी म्हटलं. त्यावेळी, सभेसाठी आलेल्या उपस्थितांमध्ये हशा पिकला
भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत सध्याचे राजकारणी अडथळा असल्याचं सूचवलं आहे. जगातील एवढे देश मोठे होऊ शकतात, तर महाराष्ट्राने काय घोडं मारलंय. महाराष्ट्र आहेच मोठा, पण या राजकीय लोकांच्या स्वार्थापायी हे सगळं घोडं अडलंय, पाणी अडलंय. अडलेलं पाणी मोकळं करण्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. या लोकांचे गुलाम म्हणून तुम्ही राहू नका, तुमच्यासमोर एक चांगलाच मनसेच्या रुपाने आम्ही देतोय, असे म्हणत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राज ठाकरेंनी फटकेबाजी केली.
राज्य सरकारकडून मराठा आरक्षण शक्य नाही
राज ठाकरे आज मराठवाड्यातील लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यामध्ये तापला असतानाच आणि मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये किती फटका देणार याची चर्चा रंगली असतानाच आज राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भाष्य करत हे शक्य नसल्याचं पुन्हा एकदा म्हटले. लातूरमध्ये आज राज ठाकरे यांची मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी रेणापुरात बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवरही हल्लाबोल केला.
हेही वाचा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा