मोदी आता जातीवर बोलतायेत, मग दलित बांधवांवर अत्याचार झाले तेव्हा गप्प का होते? : राज ठाकरे
जर बीफ निर्यात करणारे तुमचे मित्र आहेत, मग गो-हत्येच्या नावावर माणसं मारली गेली तेंव्हा तुम्ही का गप्प बसलात? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
पुणे : "मी मागास जातीचा असल्यामुळे काँग्रेसने मला शिव्या दिल्या" या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. तुम्ही सत्तेवर असताना पाच वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होते? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला.
नांदेड, सोलापूर, इचलकंरजी, साताऱ्यानंतर आज राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा पार पडली. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजमधील सभेत नरेंद्र मोदींनी मी मागस असल्याने काँग्रेसने अनेकदा माझी लायकी दाखवणाऱ्या, माझी जात सांगणाऱ्या शिव्या दिल्या, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर गेल्या पाच वर्षात तुम्ही सत्तेवर असताना दलितांवर अन्याय झाले त्यावेळी तुम्ही कुठे होतात. गुजरातमधील उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली, त्यावेळी तुम्ही गप्प का होते? असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना विचारला.
उनामध्ये गाय मारली असा आरोप करत कथित गोरक्षकांनी अनुसूचित जातीतील काही लोकांना बेदम मारहाण करत त्यांची धिंड काढली होती. मात्र त्या घटनेवर नरेंद्र मोदींनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यावेळी एकीकडे गोरक्षकांचा हैदोस सुरु असताना, माझे अनेक जैन मित्र बीफ एक्सपोर्ट व्यवसायात असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितल्याचा व्हिडीओ राज ठाकरेंनी आपल्या सभेत उपस्थितांना दाखवला. त्यामुळे तुमची नेमकी भूमिका काय? अशा मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी तुम्ही काय केलं? जर बीफ निर्यात करणारे तुमचे मित्र आहेत, मग गो-हत्येच्या नावावर माणसं मारली गेली तेंव्हा तुम्ही का गप्प बसलात? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
काय म्हणाले होती पंतप्रधान नरेंद्र मोदी?
"मागास जातीचा असल्याने अनेक वेळा अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्यांनी माझी लायकी दाखवणाऱ्या, माझी जात सांगणाऱ्या शिव्या देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. पण यावेळी ते आणखीच पुढे गेले आहेत, आता संपूर्ण मागास समाजाला चोर म्हणायला लागले आहेत. अरे मला शिव्या द्या, मी अनेक वर्षांपासून सहन करत आलो आहे आणि करेन. पण चौकीदार, मागास वर्ग असो, दलित, पीडित, शोषित, आदिवासी असो, जर कोणालाही अपमानित करण्यासाठी तुम्ही चोर म्हणण्याची हिंमत केली, तर मोदी सहन करणार नाही, हा देश सहन करणार नाही."