... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
अमित शाह यांनी केंद्रात सहकार खातं तयार केलं आणि त्यांनी ते खात आपल्या बुडाखाली ठेवलं. म्हणजे तुम्ही मेहनत करायची, कर्जबाजारी तुम्ही व्हायचे आणि तुमच्या साखरेला मुंग्या शहांच्या लागणार
अहमदनगर : विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिग्गज नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सभांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती होती. येथील सभेत बोलताना पुन्हा एकदा ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाहांना (Amit Shah) लक्ष्य केलं. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्यावरुन आणि राज्यातील शेतकरी आत्महत्येवरुन त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. या मतदारसंघाचे प्रश्न सोडवयाचे असेल तर आपल्या मतात फूट पाडता येणार नाही. उद्धव ठाकरे यांना संपवायला सर्वच निघाले आहेत. मला संपवण्यापेक्षा देशाच्या शत्रूला संपवा, असे म्हणत ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
अमित शाह यांनी केंद्रात सहकार खातं तयार केलं आणि त्यांनी ते खात आपल्या बुडाखाली ठेवलं. म्हणजे तुम्ही मेहनत करायची, कर्जबाजारी तुम्ही व्हायचे आणि तुमच्या साखरेला मुंग्या शाहांच्या लागणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केद्रीयमंत्री अमित शाहांना लक्ष्य केलं. महाराष्ट्र जर मोदी आणि शहा यांच्या हातात जात असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. मी दहा रुपयात जेवण दिल ना? पण त्याची जाहिरात केली नाही. शेतकऱ्यांबद्दल जर ममत्व असेल तर बियाणांवरील जीएसटी माफ करा, मगच शेतकऱ्यांकडे मत मागायला या असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिले आहे. दरम्यान, आपल्या प्रत्येक सभेतून उद्धव ठाकरे केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
मोदींच्या सभेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो
महाराष्ट्रातील शेतकरी मारतोय आणि तुम्ही माझ्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळवताय. मुंबईत मोदींची सभा आहे, त्या सभेच्या बॅनरवर फोटो कुणाचा तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. मोदी मुंबईत आल्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर लोळत लोळत जातील, आणि म्हणणार आम्हाला मतदान करा, असे म्हणत मतांसाठी बाळासाहेबांचा फोटो वापरला जात असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला आहे.