Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके
maharashtra vidhan sabha election 2024: लक्ष्मण हाके यांची शरद पवार गटावर टीका. विधानसभेला तुतारीचे उमेदवार पाडण्याचा इशारा.
धाराशिव: देवेंद्र फडणवीस फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध का, असा सवाल ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील क्षमता पाहा. त्यांनी मराठा समाजातील तरुणांना रोजगार दिले असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायला विरोध का? फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का ? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपस्थित केला. ते बुधवारी धाराशिव येथे वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
जिथे वंचितचा उमेदवार नाही, ओबीसी आरक्षणाच्या विचाराचा उमेदवार नाही. वंचितचा उमेदवार नसेल तिथे एक वेळेस भाजपला मतदान करु. मात्र, शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांचं आंदोलन मोठं केल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्रात ओबीसीचे 25 आमदार सत्तेत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी समाज यावेळेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेतलेला दिसेल . यावेळी भलेभले तुतारीचे उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीत. होळकरांचे वंशज म्हणून कोणालाही पवार सध्या उभे करीत असून रोहित पवार व प्रवीण गायकवाड यांच्या स्क्रिप्टवर चालणारा बाहुला आहे, असा टोला हाकेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष भूषण सिंह होळकर यांना लगावला. होळकरांचे वंशज अमेरिकेपासून रॉयल फॅमिली आहे. ती असल्या राजकारणापासून लांब असल्याचा खुलासा लक्ष्मण हाके यांनी केला. य़ावर आता शरद पवार गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील मराठा आणि ओबीसी संघर्ष चर्चेचा विषय ठरला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील वातावरण प्रचंड तापले होते. मराठा समाज महायुती सरकार आणि भाजपवर नाराज असल्यामुळे मराठवाड्यात महायुतीचे अनेक उमेदवार पडले होते. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनाही पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे आता विधानसभेला काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.
आणखी वाचा
मराठा-ओबीसी संघर्षामुळे परळीत पराभव होण्याची भीती वाटते का? धनंजय मुंडे म्हणाले...