North West Mumbai Loksabha: मतदान केंद्रावर भाजपचा ज्येष्ठ नेता समोर दिसताच अमोल कीर्तिकरांनी वाकून केला नमस्कार अन्
Mumbai Lok Sabh Voting: मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत मतदान. सकाळच्या वेळेत नागरिकांची मतदानासाठी मोठी गर्दी. वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत.
मुंबई: राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. हा राज्यातील मतदानाचा पाचवा आणि अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाच्या रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात सामना आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला होता. त्यानंतर आज मतदानाच्या दिवशीही अमोल कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अमोल कीर्तिकर यांनी सोमवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. याच मतदान केंद्रावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक मतदानासाठी आले होते.
राम नाईक आणि अमोल कीर्तिकर हे दोघे मतदान केंद्रावर समोरासमोर आले. त्यावेळी अमोल कीर्तिकर खाली वाकत राम नाईक यांच्या पाया पडले. यानंतर अमोल कीर्तिकर निघून जात असताना राम नाईक यांनी त्यांना पुन्हा बोलावून घेतले. यानंतर दोघांनी मिळून फोटो काढला.
वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी: अमोल कीर्तिकर
अमोल कीर्तिकर यांनी मतदानासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी 'एबीपी माझा'शी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आपले वडील गजानन कीर्तिकर यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मला वडिलांची उणीव जाणवली. गेल्या तीन टर्मपासून माझे वडील गजानन कीर्तिकर हे वायव्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते. तेव्हा ते उमेदवार म्हणून जबाबदारी सांभाळायचे तर मी त्यांना बॅक सपोर्ट द्यायचो. यावेळी दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पडत होतो. त्यामुळे नक्कीच माझा दमछाक झाली. पण वडील सोबत नसले तरी मविआतील जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी प्रेमाने आणि मायेने साथ दिली, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील: प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर हे भाजपमध्ये जातील, असा खळबळजनक दावा वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यांनी गोरेगावमधील प्रचारसभेत हे वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात, पोरगा एका पक्षात, असे चित्र आहे. सत्ता काही आपल्या कुटुंबातून जाता कामा नये, अशी परिस्थिती याठिकाणी दिसत आहे. मित्रांनो हे नकली नाटक याठिकाणी झालंय, दिखाव्याचं नाटक झालंय, यावर आपण विश्वास ठेवू नका. निवडणूक झाली तर दुसरासुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.
आणखी वाचा