Nashik Municipal Election 2026 : नाशिकमध्ये 15 हायव्होल्टेज लढती, प्रमुख नेत्यांमध्ये टफ फाइट, भाजपविरोधात शिंदे-अजितदादांच्या उमेदवारांचे आव्हान, ठाकरेंची फौजही मैदानात
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागांमधील 122 जागांसाठी तब्बल 735 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Nashik Municipal Election 2026) रणसंग्राम आता पूर्णपणे तापला असून शहरातील 31 प्रभागांमधील 122 जागांसाठी तब्बल 735 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी आणि चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच प्रभागांतील प्रमुख लढती स्पष्ट झाल्या असून, किमान 15 प्रभागांमध्ये हाय-व्होल्टेज आणि टफ फाइट पाहायला मिळणार आहे.
या निवडणुकीत भाजपने स्वबळावर सर्वाधिक 116 उमेदवार उभे केले असून दोन उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती झाली असून शिंदे गटाने 102, तर अजित पवार गटाने 42 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे 79, मनसेचे 30, काँग्रेसचे 22 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 31 उमेदवार मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे 55 जागांवर उमेदवार दिले आहेत.
प्रभाग 1 : भाजप विरुद्ध शिंदेसेना
प्रभाग 1 ड मध्ये भाजपचे अरुण पवार आणि शिंदे गटाचे प्रवीण जाधव यांच्यात थेट सामना होत आहे. १ ब मध्ये भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी यांच्यासमोर शिवसेनेचे गणेश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे विशाल पोरिंदे आव्हान उभे करत आहेत. क गटात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये घरवापसी केलेल्या गणेश गिते यांच्या पत्नी भाजप उमेदवार दीपाली गिते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या उर्मिला निरगुडे उभ्या आहेत.
प्रभाग 5 : माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर
प्रभाग 5 ड मध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक (अपक्ष, शिंदे गट पाठींबा) आणि माजी उपमहापौर गुरमित बग्गा (भाजप) यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. ५ अ मध्ये खंडू बोडके विरुद्ध भाजप बंडखोर कमलेश बोडके हा सामना देखील चुरशीचा ठरणार आहे.
प्रभाग 7 : शहरातील मोठी कसोटी
भाजपचे माजी नगरसेवक योगेश हिरे विरुद्ध शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्यातील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे. भाजपचे तीनही आमदार हिरे यांच्यासाठी मैदानात उतरल्याने ही लढत अधिक तीव्र झाली आहे.
प्रभाग 9 : चुलत भावांमध्ये सामना
प्रभाग 9 ड मध्ये भाजपचे अमोल पाटील विरुद्ध शिंदे गटाचे प्रेम पाटील (माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र) यांच्यात कौटुंबिक वादातून निर्माण झालेली थेट लढत रंगणार आहे. ब गटात भाजपचे दिनकर पाटील विरुद्ध शिवसेनेचे गुलाब माळी, महाविकास आघाडीच्या (उबाठ) कावेरी कांडेकर अशीही लढत आहे.
प्रभाग 29 : बडगुजर घराण्याची प्रतिष्ठा
भाजपचे दीपक बडगुजर विरुद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष मुकेश शहाणे यांच्यातील सामना अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. बडगुजर कुटुंबाची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली आहे.
प्रभाग 25 : बडगुजर विरुद्ध शिंदेसेना
भाजपचे सुधाकर बडगुजर विरुद्ध शिंदे गटाचे ॲड. अतुल सानप आणि उबाठाचे अतुल लांडगे असा तिरंगी सामना रंगणार आहे. एबी फॉर्मच्या वादामुळे हा प्रभाग आधीपासून चर्चेत आहे.
प्रभाग 15 : गिते विरुद्ध भालेराव
उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते विरुद्ध भाजपचे मिलिंद भालेराव यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. गिते कुटुंबाची ताकद या प्रभागात कसोटीला लागली आहे.
प्रभाग 24 : बहुरंगी लढत
भाजपचे कैलास चुंभळे विरुद्ध शिंदे गटाचे प्रवीण तिदमे, तसेच ड गटात भाजप–शिंदे–उबाठ अशी तिहेरी लढत रंगणार आहे.
प्रभाग 13 : शाहू खैरे विरुद्ध गणेश मोरे
भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले शाहू खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे गणेश मोरे यांच्यात थेट लढत होत आहे. याच प्रभागात भाजप, उबाठा आणि काँग्रेसमध्ये तिरंगी सामना आहे.
इतर हायव्होल्टेज लढती
प्रभाग 16 : कुणाल वाघ (भाजप) विरुद्ध राहुल दिवे (शिंदेसेना)
प्रभाग 12 : नुपूर सावजी (भाजप) विरुद्ध डॉ. हेमलता पाटील (अजित पवार गट)
प्रभाग 17 : दिनकर आढाव (भाजप) विरुद्ध राजेश आढाव (शिंदेसेना)
प्रभाग 20 : संभाजी मोरुस्कर (भाजप) विरुद्ध कैलास मुदलीयार (शिंदेसेना)
प्रभाग 30 : अजिंक्य साने (भाजप) विरुद्ध सतीश सोनवणे (राष्ट्रवादी)
प्रभाग 12 : शिवाजी गांगुर्डे (भाजप) विरुद्ध समीर कांबळे (शिंदेसेना)
Nashik Election 2026 : नाशिकमध्ये कोण जिंकणार?
एकीकडे भाजप स्वबळावर सत्ता टिकवण्याच्या तयारीत असताना, शिंदे–अजित पवार गट भाजपला आव्हान देत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसने जोरदार प्रचार सुरू केला असून नाशिक महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आणखी वाचा




















