Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपच्या राड्यानंतर शिंदेसेनेतही वाद पेटला; उमेदवाराकडून थेट पत्नीसह आयुष्याचा शेवट करण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गंभीर अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) गंभीर अंतर्गत वाद उफाळून आला असून, प्रभाग क्रमांक 31 मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पत्र पोस्ट करत थेट पक्षातील काही प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर शिवा तेलंग (Shiva Telang) हे संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, 2022 साली त्यांनी आणि त्यांची पत्नी पूजा तेलंग यांनी शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग क्रमांक 31 मध्ये पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेचे काम केले. प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत अनेक कार्यक्रम, विकासकामे आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. मात्र माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांनी आपला केवळ राजकीय वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Nashik Mahanagarpalika Election 2026: 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पण कामे नाही
पत्रात पुढे म्हटले आहे की, पक्षप्रवेशाच्या वेळी मोठ्या निधीची कमिटमेंट करण्यात आली होती. प्रभागात तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात फक्त भूमिपूजन झाले, कामे कुठेच झाली नाहीत. आलेला निधी नेमका कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अमोल जाधव यांच्या माध्यमातून निधी आणल्याचा दावा करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष कामे कुठेच न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Nashik Mahanagarpalika Election 2026: पैशांची देवाणघेवाण करून तिकीट वाटल्याचा आरोप
29 तारखेला रात्री कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवा तेलंग यांनी केला आहे. या प्रक्रियेत हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, प्रवीण बंटी तिदमे यांच्यासह काही नेते सहभागी असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. एबी फॉर्म मिळवण्यासाठी पैसे मागितल्याचा आणि पैसे देऊन फॉर्म घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Nashik Mahanagarpalika Election 2026: विश्वासघात झाल्याचाही दावा
विशेष म्हणजे, प्रभागात एकाच वेळी दोन जणांना एबी फॉर्म देण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला पुरस्कृत करण्याचे आदेश दिले असतानाही ते अमलात न आणल्याचा आरोप सुदाम ढेमसे यांच्यावर करण्यात आला आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सगळी माहिती दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर निर्णय बदलण्यात आल्याने आपला विश्वासघात झाल्याची भावना शिवा तेलंग यांनी व्यक्त केली आहे.
Nashik Mahanagarpalika Election 2026: “मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे,”
पत्राच्या शेवटी शिवा तेलंग यांनी अत्यंत गंभीर इशारा देत आपल्या संभाव्य आत्महत्येस सुदाम ढेमसे, विजय करंजकर, हेमंत गोडसे, अनिल गायकवाड, अमोल जाधव, रवी धामणे, अजय पाटील आणि अजय बोरस्ते हे जबाबदार राहतील, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. “मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे,” असे नमूद करत त्यांनी पत्नी व मुलांना न्याय देण्याची विनंती नागरिकांना केली आहे. दरम्यान, हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवा तेलंग हे ‘नॉट रिचेबल’ असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद, तिकीट वाटपाची पद्धत आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पक्ष नेतृत्व या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा




















