Nashik Crime : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा धुमाकूळ; पुणे, मुंबई नंतर आता नाशकात मोठं घबाड सापडलं
Nashik Crime : पुणे, मुंबईनंतर आता पोलिसांनी नाशकात मोठं घबाड जप्त केलं आहे.
Nashik Crime : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Maharashtra Vidhansabha Election) जाहीर झाल्यानंतर राज्यात आदर्श आचरसंहिता लागू झाली आहे. मात्र, असं असताना राज्यात अनेक ठिकाणी पैशांचा धुमाकूळ सुरु आहे. आत्तापर्यंत पुणे आणि मुंबईत दोन ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पैशांच्या बॅगा जप्त केल्या होत्या. आता नाशकातही मोठं घबाड सापडलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) दोन ठिकाणी सापडले लाखो रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान सापडले 20 लाख 50 हजार तर , उपनगर परिसरातील घर झडतीत सापडले अकरा लाख सापडले आहेत.
पैशाचा राजकीय व्यक्ती किंवा पक्षाशी संबंध आहे का?
नाशिकच्या (Nashik) उपनगर परिसरात असलेल्या भालेराव मळा परिसरातील झोपडपट्टीत पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. नाशकात एका घराची घडती घेतली असता मोठा प्रमाणात पैसा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे नाकाबंदी दरम्यान कारमध्ये सापडलेल्या कारचालकाला पोलिसांनी उचललं आहे. नाशिक पोलिसांना तपासाच्या दरम्यान 31 लाख रुपये सापडले आहेत. पोलिसांना सापडलेल्या पैशाचा राजकीय व्यक्ती किंवा पक्षाशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
घराची झडती घेतल्यानंतर मोठा मुद्देमाल जप्त
नाशिक (Nashik) शहर उपायुक्त मोनिका राऊत म्हणाल्या, आज नाशकात दोन ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली आहे. याच्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन याठिकाणी 11 लाखांची कॅश जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ऋषी वानखेडे या बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीकडे रोख रक्कम असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही त्याच्या घराची झडती घेतली. त्याठिकाणी आम्हाला 11 लाखांची रोकड मिळाली. सदर रोकड आम्ही जप्त देखील केली आहे. पुढील कारवाई आम्ही सुरु केली आहे.
सातपूर पोलीस स्टेशन येथे एका कारमधून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर कार एसएसटी पॉईंटवर चेकिंग करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जप्त केली आहे. सदर कारमध्ये पैसे कोठून आले? याचा तपास आम्ही सुरु केला असल्याचेही उपायुक्त राऊत यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या