एक्स्प्लोर
Advertisement
नंदूरबार विधानसभा मतदारसंघ : डॉ. विजयकुमार गावितांसाठी विजय तर सोपा पण..
नंदूरबार हा 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांचा मतदारसंघ. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ गावितांसाठी खूप सोपा झाला आहे, फक्त आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे आला तर मग चित्र वेगळं दिसू शकतं.
नंदूरबार जिल्ह्याचं राजवैभव असलेला विधानसभा मतदार संघ म्हणजे नंदूरबार विधानसभा मतदार संघ. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ विजयकुमार गावित निवडून आले तेव्हा पासून या मतदार संघाकडे मंत्री पद होते. याला अपवाद फक्त २०१४ ची पंचवार्षिक होती, यात हा मतदार संघ मंत्रीपदाविना राहिला.
नंदूरबार जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. या बाल्लेकिल्ल्यात आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॉ विजयकुमार गावित यांना महत्वपूर्ण खात्याचे मंत्रीपद देऊन जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करून घेतला. याच काळात गावितांकडे आदिवासी विकास विभागाचा कारभार सोपवण्यात आला आणि त्यांनी जिल्हाभरात त्यांना मानणाऱ्या निष्टावंत कार्यकर्त्यांची फौज उभारली. या कार्यकर्त्यांसाठी डॉ गावित हेच पक्ष असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे.
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपली कन्या डॉ हीना गावित यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला. गाविताच्या भाजप प्रवेशाने या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली. एकेकाळचा राष्ट्रवादीचा गड आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.
नंदूरबार विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर या मतदार संघात शहर आणि तालुक्याचा पूर्व पट्टा आणि शहादा तालुक्यातील तापी काठाचा समावेश आहे. २००९ च्या पुनर्रचनेत आपल्या प्रस्थापित कार्यकर्त्यांच्या गावांचा समावेश नंदूरबार विधानसभा मतदारसंघात झाल्याने हा मतदारसंघ अधिक सुरक्षित झाला आहे. १९९५ पासून त्यांना या मतदार संघातून कुणीच पराभूत करू शकलेलं नाही.
जातीय समीकरण
या मतदार संघातील जातीय समीकरणाचा विचार केल्यास या मतदार संघात आदिवासी मराठा कुणबी, राजपूत आणि गुजर समाजाच्या मतांची संख्या निर्णायक आहे आणि तेच सूत्र विद्यमान आमदारांना सापडल्याने त्यांच्या विजयाचे गणित सोपं झालं आहे.
नंदूरबार विधानसभा मतदार संघातील राजकारण
नंदूरबार विधानसभा मतदार संघातील सर्वात महत्वाची आणि मोठी नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक कॉंग्रेस पक्षाचे आहेत. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि डॉ गावित यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. मात्र आघाडीच्या काळात हा मतदार संघ राष्ट्रवादीला सुटला असल्याने कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली जहागिरी कायम ठेवली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत १९९५ पासून ही जहागिरी काँग्रेसला टिकवता आलेली नाही. त्या उलट विजयकुमार गावित यांच्याकडे तापी काठावरील वोट बँक सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांचासारखा मोठा नेता असल्याने विजयकुमार गावितांचा विजय सोपा होतो. उलट कॉंग्रेसकडे तापीकाठावर नेतृत्व नसल्याने डॉ गाविताना या भागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळतं.
नंदूरबार विधानसभा मतदार संघातील मतदार राजा जागरूक असून आमदार रघुवंशी आणि गावित यांच्यात सत्तेची समान वाटणी करून देतात. आघाडीच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे. मात्र डॉ गावितानी भाजपात प्रवेश केल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी फक्त नावालाच उरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला या ठिकाणाहून दमदार उमेदवारही मिळणार नाही. त्यामुळे विजयकुमार गावित यांचा विजय आणखी सोपा असल्याचं जाणकारांना वाटतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागावाटपात या मतदार संघावर कॉंग्रेसने दावा केला आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही सारासार विचार करुन काँग्रेसला हा मतदारसंघ दिला तर मग भाजपा समोर अडचणी उभ्या राहतील.
२०१४ विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
डॉ विजयकुमार गावित (भाजपा )१०१३२८
कुणाल वसावे (कॉंग्रेस ) ७४२१०
डॉ विजयकुमार गावित २७११८ च्या मताधिक्याने विजयी झाले होते
लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास या विधानसभा मतदार संघातून खासदार हीना गावित यांना जवळपास ७० हजारांचं मताधिक्य मिळालं आहे आणि त्यातून त्यांची विजयी वाटचाल सुरु आहे. त्यामुळे गावितांसाठी हा विधान सभा मतदार संघ अधिक सुरक्षित झाला आहे
लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते
डॉ हीना विजयकुमार गावित (भाजपा )१३२२६४
के सी पाडवी (काँग्रेस )६१९८२
डॉ हिना गावीत यांना ७०२८२ मतांचा विक्रमी लीड मिळाला होता.
नंदूरबार लोकसभा मतदार संघाचा विस्तार शहादा आणि नंदूरबार तालुक्यात झाला आहे. जिल्हा निर्मितीनंतर शहरात अनेक शासकीय कार्यालयाच्या टोलेजंग इमारती उभ्या झाल्या आहेत. मात्र अजूनही नंदूरबारचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालेलं नाही. जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णालय अजून सुरु झालेलं नाही.
नंदूरबार जिल्ह्यात मिरचीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. नंदूरबार ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजार पेठ आहे. मात्र अनेक आश्वासनानंतरही चिली पार्क अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे इतके दिवस या मतदार संघाला राजवैभव होतं मात्र काही समस्या आणि मागण्या सुटायचं नावच घेत नाहीत.
सध्याच्या परिस्थितीत नंदूरबार विधानसभा मतदारसंघ डॉ विजयकुमार गावित यांच्यासाठी सोपा आणि सुरक्षित मतदारसंघ आहे. आमदार गावित कार्यकर्त्यांसाठी पक्ष आहेत. मात्र हा विधानसभा मतदार संघ आघाडीत कॉंग्रेसला सुटला तर त्यांच्या समोर तगडं आव्हान उभं राहू शकतं. नंदूरबार मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास या मतदार संघात कोणतीही चुरस राहणार नाही हे मात्र निश्चित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
Advertisement