बीडमध्ये राष्ट्रवादीत नाराजी नाट्याचा दुसरा अंक, प्रचारापासून मुंदडा अलिप्त
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी नाट्याचा पक्षाला सामना करावा लागतोय. प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवारीवरुन नाराजीनाट्य सुरू झालं. आता पुन्हा मुंदडा गट नाराज असल्याने भाजपासमोर आव्हान उभं करताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी एक संघ लढणार का हाच मोठा प्रश्न आहे.
बीड : बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना तिकीट मिळाल्यानंतर सुरुवातीला अमरसिंह पंडित समर्थक नाराज असल्याचे चित्र समोर आलं होतं. अमरसिंह पंडित यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलं असलं तरी आता मुंदडा गट अद्याप प्रचार यंत्रणेपासून अलिप्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमापासून नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मात्र दूरच राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अक्षय मुंदडा गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी नाट्याचा दुसरा अंक केजमध्ये पाहायला मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंदडा गटाला स्थानिक नेतृत्व मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांनी केज मतदार संघाची सूत्रे पूर्णपणे देण्याची मागणी केली होती. अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंदडा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. आधीच गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीस मुंदडा गटाच्या नाराजीमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्याचं नेतृत्व करत असलेल्या धनंजय मुंडे यांना मात्र आपल्या स्वतःच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी नाट्याचा सामना करावा लागतोय. प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवारीवरुन नाराजीनाट्य सुरू झालं. आता पुन्हा मुंदडा गट नाराज असल्याने भाजपासमोर आव्हान उभं करताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी एक संघ लढणार का हाच मोठा प्रश्न आहे.