मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईतील 6 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे
मुंबई : देशातील पाचव्या व महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला (Voting) उद्या सुरुवात होत असून 20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यासाठी, मुंबईतील (Mumbai) 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून ठाणे, कल्याण, भिंवडी, पालघर, नाशिक, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघातही मतदान होत आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यातील या मतदानासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली असून प्रशासनाने आजच सर्वच बुथ केंद्रांवर पोहोचून तेथील तयारी पूर्ण केली आहे. उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होत आहे. देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, दिग्गज राजकारण्यांसह बड्या हस्ती मतदान करणार आहेत. त्यातच, उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनीही मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
मुंबईतील 6 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनीही मुंबईकरांसाठी विशेष ट्विट केलंय. सोमवार हा मतदानाचा दिवस आहे, मुंबईकरांनो घराबाहेर पडून मतदानाचा हक्क आणि जबाबदारी निभावा, असे आवाहन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांच्या ट्विटला 45 हजार लाईक्स मिळाले असून 9 लाख 23 हजार जणांनी हे ट्विट पाहिल्यांचं दिसून येतेय. तर, 4.9 हजार युजर्संने हे ट्विट रिट्विट केलंय. तर, बातमी लिहीपर्यंत 994 कमेंट त्यांच्या ट्विटवर पडल्या आहेत.
Monday is voting day in Mumbai. I urge all Mumbaikars to go out and vote responsibly.
— Ratan N. Tata (@RNTata2000) May 18, 2024
मुंबईतील 6 जागांवर महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सामना?
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव
दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई
उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील
उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड
उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील
वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर
पालघरमध्ये 21 लाख 48 हजार मतदार
दरम्यान, पाचव्या टप्प्यात पालघर मध्ये देखील मतदान होणार असून पालघर 22 या अनुसूचित जमाती मतदारसंघात 21 लाख 48 हजार 850 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 11 लाख 25 हजार 209 पुरुष मतदार 10 लाख 23 हजार 80 स्त्री मतदार तर 225 तृतीयपंथी मतदार असून यासाठी जिल्ह्यात एकूण 2270 मतदान केंद्र असणार आहेत. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 13921 कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात असतील. 20 तारखेला सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे . या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी अस आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी केलं आहे.
कल्याणमध्ये प्रशासन सज्ज
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 20 तारखेला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देखील सज्ज झालाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल 11000 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेसह एस आर पी एफ, होमगार्ड असे एकूण 3000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. आज पोलीस बंदोबस्तात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य घेऊन आज अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत हे साहित्य वाटपाला सुरुवात होणार असून सकाळी 7 वाजता मतदान सुरु होईल.