ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Mumbai Assembly Election 2024 : मुंबईत शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती, तर भाजप 17 किंवा 18 जागा आणि राष्ट्रवादी 3 किंवा 4 जागांवर लढण्याची शक्यता
Mumbai Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत (Mumbai) शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गट 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एकूण 17 जागांवर शिवसेनेनं निरीक्षक नेमले होते. आता या 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. तसेच, उर्वरित जागा भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला (NCP) मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महायुतीचा (Mahayuti) मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईत शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती, तर भाजप 17 किंवा 18 जागा आणि राष्ट्रवादी 3 किंवा 4 जागांवर लढण्याची शक्यता आहे.
महायुतीचा मुंबईतील संभाव्य फॉर्म्युला :
भाजप : 17 किंवा 18 जागा
शिवसेना : 15 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 3 किंवा 4 जागा
शिवसेनेनं निरीक्षक नेमलेल्या 'त्या' 17 जागा
भायखळा, वरळी, शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारावी, भांडुप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागठाणे, चांदिवली, कलिना या 17 जागांवर शिवसेनेनं निरीक्षक नेमले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या निरिक्षकांची निवड करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फार पूर्वीच विधानसभेसाठी कंबर कसली होती. त्यांनी याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात 113 विधानसभा मतदारसंघातील 46 विधानसभा प्रभारी जाहीर केलेल्या. तसेच, 93 विधानसभा निरीक्षकपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला?
महायुतीतल्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागांबाबत दिल्लीत अमित शाहांच्या समक्ष चर्चा झाली. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अडीच तास चर्चा झाली. तीनही नेत्यांनी जागावाटपाचा तिढा सोडवला असल्याची माहिती आहे. आता केवळ काही जागांचाच प्रश्न बाकी आहे अशी माहिती दिल्लीतून समजतंय.
33 मतदारसंघांमध्ये निकाल पालटवण्याची ताकद
विधानसभा निवडणुकांसंदर्भातली एक महत्त्वाची आकडेवारी आणि ही आकडेवारीच नेमकी महायुती महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारी ठरतेय. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचा विचार केला तर 33 विधानसभा मतदारसंघांमध्ये निकाल पालटवण्याची ताकद दिसून येतेय. 33 पैकी 31 मतदारसंघ तर काठावरचे आहेत. म्हणजे तिथे 5000 हून कमी मतांचं अंतर होतं. त्यामुळे 31 मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांना समसमान संधी आहे. 15 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव अवघ्या 5 हजारांनी किंवा त्याहून कमी मतांनी झालाय.