"तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरी हार के हैं"; दुःखातून सावरलं, अश्रुंना आवरलं, निवडणुकीत हरवणाऱ्याला भाजप आमदाराचं शायराना अंदाजात प्रत्युत्तर
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी शायराना अंदाजात त्यांनी निवडणुकीत हरवणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला प्रत्युत्तर दिलं आहे.
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) गृहमंत्री (Home Minister of Madhya Pradesh) नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) दतियामधून विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभूत झाले. काँग्रेसचे (Congress) उमेदवार राजेंद्र भारती (Rajendra Bharti) यांनी त्यांचा 7742 मतांनी पराभव केला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नरोत्तम मिश्रा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये ते पराभवाच्या दुःखातून स्वतःला सावरत प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र भारती यांना शायराना अंदाजात प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. नरोत्तम मिश्रा आपल्या पराभवावर म्हणतात, "इतना भी गुमान न कर अपनी जीत पर ऐ बेखबर, तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरी हार के हैं" (तुझ्या विजयाचा एवढा अभिमान बाळगू नकोस, अज्ञानी, तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाचीच चर्चा जा आहे.)
नरोत्तम मिश्रा रेल्वेनं दतियाहून भोपाळला (Bhopal) जात होते. यावेळी ते त्यांच्या समर्थकांसमोर भावूक झाले आणि त्यांनी प्रतिस्पर्धी राजेंद्र भारती यांना आपल्या शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिलं.
लोकांनी घेतलेला निर्णय नेहमीच योग्य : नरोत्तम मिश्रा
पराभवानंतर नरोत्तम मिश्रा म्हणालेले की, "मला दतिया आणि राज्यातील जनतेचे आभार मानायचे आहेत. जनतेचा जनादेश आपण नेहमीच स्वीकारला पाहिजे. लोकांनी घेतलेला निर्णय नेहमीच योग्य असतो. कदाचित मी सेवा करू शकलो नाही. म्हणून त्यांनी दुसऱ्याची निवड केली. कदाचित ते (काँग्रेसचे उमेदवार) दतियाच्या लोकांच्या हितासाठी काम करतील, हाच विचार सर्वांनी केला असेल.
मी पुन्हा येईन : नरोत्तम मिश्रा
पुढे बोलताना नरोत्तम मिश्रा यांनी मी पुन्हा येईल असा विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले की, "सरकार तुमचं आहे, आव्हान तुमचं आहे आणि पक्षही तुमचाच आहे. समुद्राचं पाणी कमी होत असल्याचं पाहून कोणत्याही भ्रमात राहू नका, किनाऱ्यावर घर बांधू नका. मी परत येईन, हे वचन आहे. आणि मी दुप्पट गती आणि उर्जेनं परत येईन."
मध्यप्रदेशात भाजपला बहुमत
राजस्थान आणि छत्तीसगड व्यतिरिक्त मध्य प्रदेशातही भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. मध्य प्रदेशात भाजपनं 163 तर काँग्रेसनं 66 जागा जिंकल्या आहेत. मात्र, शिवराज सरकारमधील 12 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये नरोत्तम मिश्रा, अरविंद भदौरिया, कमल पटेल, महेंद्रसिंह सिसोदिया, गौरीशंकर बिसेन, भरत सिंह कुशवाह, रामखेलावन पटेल यांच्यासह 12 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले.