Mohol Vidhansabha Election : शरद पवारांनी रमेश कदमांच्या 26 वर्षीय मुलीला उतरवलं मैदानात, उच्चशिक्षित तरुणीला राष्ट्रवादीचं तिकीट
Mohol Vidhansabha Election : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
Mohol Vidhansabha Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) आज (दि.27) नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे परळीमध्ये शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात मराठा उमेदवार उतरवला आहे. परळीमध्ये राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मोहोळमध्ये रमेश कदम यांच्या मुलीला मैदानात उतरवण्यात आले आहे. सिद्धी रमेश कदम (Siddhi Kadam) यांच्या मुलीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोहोळमध्ये उमेदवारी दिली आहे.
सिद्धी रमेश कदम कोण आहेत?
सिद्धी रमेश कदम या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या आहेत. मुंबईतील जगप्रसिद्ध टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार पैकी सर्वात तरुण उमेदवार सिद्धी कदम या आहेत. सिद्धी कदम यांचे वय 26 वर्षे आहे. वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात अटकेत असताना 2019 च्या निवडणुकीत सिद्धी हिनेच प्रचार यंत्रणा सांभाळली होती. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना 25 हजार मतं मिळाली होती.
रमेश कदम यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांनी तुरुंगवास भोगला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ते तुरुंगातून बाहेर पडले होते. रमेश कदम यांनी 8 वर्ष ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगला होता. जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते. गेल्या काही आठवड्यापूर्वी मोहोळमधून उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.
दरम्यान, रमेश कदम यांच्यावर असलेला ठपका पाहता शरद पवार गटाने सिद्धीला संधी दिल्याचे दिसते आहे. मोहोळमधून शरद पवार गटाकडून अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये संजय क्षीरसागर, राजू खरे यांची नाव आघाडीवर होते. अशात सिद्धी हिचे नावं अचानक जाहीर केल्याने मोहोळ मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोहोळमध्ये विद्यमान आमदार यशवंत माने यांना मैदानात उतरवलं आहे. शिवाय मोहोळ मतदारसंघात राजन पाटील यांचेही वर्चस्व असल्याचे बोलले जाते. राजन पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भावाची भावकी झाली, लेकासाठी बाप उतरला मैदानात; श्रीनिवास पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ