एक्स्प्लोर
मनसेसाठी महाआघाडीचे दरवाजे बंद, राष्ट्रवादीकडून कल्याण, ईशान्य मुंबईचे उमेदवार जाहीर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत सहभागी होईल अशी चर्चा व्यक्त केली जात होती. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत सहभागी होईल अशी चर्चा व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेसाठी महाआघाडीचे दरवाजे बंद केले आहेत. महाआघाडीत सामील झाल्यास मनसेला ज्या कल्याण आणि ईशान्य मुंबईच्या जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मनसे आता स्वबळावर लढणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
राष्ट्रवादीने कल्याणमध्ये बाबाजी पाटील आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे 20 मार्च रोजी भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाआघाडीत समावेश न झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार का? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरे महाआघाडीत सहभागी होतील, अशी चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत अनुकूल असल्याचेही पाहायला मिळाले होते. परंतु राज ठाकरेंना काँग्रेसमधून विरोध होता. त्यामुळे मनसेच्या महाआघाडीतील समावेशाबाबत सर्वांनाच संभ्रम होता. दरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवरुन स्पष्ट होते की, मनसेचा महाआघाडीत समावेश होणार नाही.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement















