(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Thackeray : आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? अमित ठाकरे यांचे निवडणूक लढवण्याचे संकेत
Amit Thackeray : गरज पडली तर मी सुद्धा निवडणूक लढवेन, असं वक्तव्य महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
Amit Thackeray : महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील आणखी एका सदस्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात निवडणूक लढवू शकतो, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी केलं. गरज पडली तर मी सुद्धा निवडणूक लढवेन, असं अमित ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यानंतर आता अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि ती खरी करुन दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी भूमिकाही जाहीर केली होती. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. आता अमित ठाकरे यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत
अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. विविध भागांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. जोरदार स्वागत त्यांचं ठिकठिकाणी केलं जात आहे. अशाच दौऱ्यादरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. सध्याची राजकीय परिस्थिती, मनसेची पुढील वाटचाल याबाबत त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं.
वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे काय म्हणाले?
शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे आता भाजपला मनसेची गरज नाही असं वाटतं का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर "असं काही नाही. आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करतो. लोकांपर्यंत पोहोचतो. कोणत्या पक्षाला कुणाची गरज आहे हे सांगता येणार नाही. मात्र महाराष्ट्राला आता राजसाहेबांची गरज आहे हे मला माहित आहे. आम्ही आता स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. युती करायची की नाही, हा निर्णय राजसाहेब घेतील. गरज पडली तर मीसुद्धा निवडणूक लढवू शकतो. यापुढे ग्रामपंचायत निवडणूक असो की विधानसभा, प्रत्येक ठिकाणी मी प्रचारासाठी जाणार आहे," असं उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं.
दरम्यान, अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या आणखी काही वक्तव्यांनी राजकीय निरीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो, अन्यथा मी राजकारणात उतरलो नसतो, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. आताची राजकीय परिस्थिती बघून राजकारणात येण्याची इच्छाच झाली नसती. सध्याची राजकारणातली परिस्थिती भयावह असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. याशिवाय शिवसेनेतले दोन गट आणि भाजपच्या राजकारणात मनसेला संधी असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
राजकारणातील प्रवेश ते निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेला प्रवास
- जानेवारी 2020 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी अमित ठाकरे यांचा राडकारणात प्रवेश
- राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अमित ठाकरे यांचा वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग
- अमित ठाकरे यांच्या राजकारण प्रवेशानंतर त्यांच्याकडे नेतेपदाची जबाबदारी
- 27 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती
VIDEO : Amit Thackeray : गरज पडल्यास भविष्यात मी सुद्धा निवडणूक लढवू शकतो : अमित ठाकरे