Mahesh Landge : आधी लेकाचा पराक्रम पाहा, स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये आलाय; पैलवान महेश लांडगेंचं 'वस्ताद' अजितदादांना आव्हान
Ajit Pawar Vs Mahesh Landge : जो आपल्या काकाचा होऊ शकला नाही तो पिंपरी चिंचवडचा कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न विचारत महेश लांडगे यांनी अजित पवारांवर टीका केली.

पुणे : अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला. अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत महेश लांडगे यांनी शड्डू ठोकले. अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आमदार महेश लांडगे यांनी एबीपी माझाशी बोलताना उत्तर दिलं.
आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा आणि ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावं. ते मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत, मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत असा पलटवार करत एकेकाळचे वस्ताद असलेल्या अजितदादांना आमदार महेश लांडगेंनी राजकीय कुस्तीचं आव्हान दिलं. त्यामुळं आता खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात पूर्वीचे वस्ताद अजितदादा विरुद्ध पैलवान महेश लांडगे अशी लढाई सुरु झाल्याचं दिसून येतंय.
अजित पवार नैराश्यात आहेत
सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय, ते नैराश्यात आहेत, अशी घणाघाती टीका महेश लांडगेंनी केली. पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, असा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर महेश लांडगे हेदेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत.
पार्थ पवारांचा पराक्रम पाहा
स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत. मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पहा असा इशारा महेश लांडगेंनी दिला. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असं म्हणत महेश लांडगेंनी अजित पवारांची खिल्ली उडवली. आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादांनी समोरासमोर बसावं. मग सर्व उत्तर मिळतील असं आव्हान महेश लांडगेंनी दिलं.
ही बातमी वाचा:




















