मतदारांच्या बोटावरची शाई पुसली नाही अन् अजित पवार गटात पक्षांतर; गुलाबराव देवकरांविरोधात मविआचे आत्मक्लेष आंदोलन
Maha Vikas Aghadi : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकतेच अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, यावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आत्मक्लेष आंदोलन करून निषेध केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाकडून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे निवडणूक लढविणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकतेच अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णय विरोधात आज शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरणगावात आत्मक्लेष आंदोलन करून देवकर यांचा निषेध केला आहे.
गुलाबराव देवकरांसाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन 84 हजार मते मिळवू दिले. यांचाच पश्चाताप म्हणून आम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ "आत्मक्लेश' आंदोलन करत असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटल आहे. यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे उपस्थित होते.
बोटावरची शाई पुसली नाही जात नाही, तोच....
आम्ही मतदान केल्याची बोटावरची शाई पुसली नाही जात नाही, तोच गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा प्रवेश करण्याचा जाहीर केला आहे. देवकर यांनी खूप मोठा दुर्देवी निर्णय घेतला आहे. आज आम्हाला खूप पश्चाताप होतोय की, आमच्या हक्काचं शिवसेनेचे टिकीट आम्ही देवकर यांना दिलं आणि त्यांच्यासाठी मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आम्ही आज आत्मक्लेश आंदोलन करीत आहोत.
कोणत्या कारणामुळे अजित पवारांसोबत जाणार?
पक्षांतराबाबत एबीपी माझाशी बोलताना गुलाबराव देवकर म्हणाले, गेली अनेक वर्ष आपणसत्तेपासून दूर राहिल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती, त्यांच्यांसाठी आपल्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढताना आपला पराभव झाल्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपण सत्तेत सहभागी व्हायला पाहिजे असा पवित्रा घेतला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आपण येत्या सोमवारी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार आहोत. या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या सोबत बोलणे झाले आहे. शरद पवार गटाला सोडून जात असलो तरी त्यांच्यासोबत या विषयावर अद्याप कोणतेही बोलणे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
तटकरेंसोबत भेटून चर्चा झाल्याची माहिती
गुलाबराव देवकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. देवकर यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. तसेच या भेटीदरम्यान देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश घेण्याची तयारी दाखवली आहे. यासह तटकरे यांनीही देवकरांच्या प्रवेशाबाबत सकारत्मकता दर्शविली आहे.सोमवारी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार आहोत. या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या सोबत बोलणे झाले आहे, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
आणखी वाचा