Maharashtra Vidhansabha Election 2024: डहाणू विधानसभेसाठी पुन्हा विनोद निकोले यांना उमेदवारी जाहीर; मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची घोषणा
Dahanu Assembly Constituency: 1978 पासून झालेल्या गेल्या 10 विधानसभा निवडणुकांपैकी तब्बल 9 वेळा ही जागा माकपने जिंकली आहे.
Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सत्ताधारी आणि विरोधकांचाही जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचा सांगितलं जातंय. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसली असून महाविकास आघाडीत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून सध्याचे डहाणू मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद निकोले हेच पुन्हा सिपीएम पार्टीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विनोद निकोले यांच्या नावाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणी कमिटीच्या बैठकीत एक मताने मंजुरी देण्यात आली असून महाविकास आघाडीने देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.
1978 पासून झालेल्या गेल्या 10 विधानसभा निवडणुकांपैकी तब्बल 9 वेळा ही जागा माकपने जिंकली आहे. संपूर्ण तलासरी तालुका आणि डहाणू तालुक्याचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत माकप केवळ महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठीच नव्हे, तर लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाला विजयी करण्यासाठीही सज्ज झाला आहे. दरम्यान, 9-10 ऑक्टोबर २०२४ रोजी तलासरी येथील कॉ. गोदावरी शामराव परुळेकर भवन येथे झालेल्या माकपच्या ठाणे-पालघर जिल्हा कार्यशाळेने 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एक पद्धतशीर प्रचार योजना तयार केली. या कार्यशाळेत 11 तालुक्यांतून 75 हून अधिक महिलांसह 365 प्रमुख कॉम्रेड्स सहभागी झाले होते.
2019 च्या निवडणुकीत काय झालं?
भाजपच्या पास्कल धणारे यांनी सीपीएमच्या विनोद निकोलेंना 2019 च्या निवडणुकीत काँटे की टक्कर दिली. पण या निवडणुकीत अवघा 4700 मतांनी पास्कल धणारेंचा पराभव झाला आणि विनोद निकोले विजयी झाले. भाजपाच्या पास्कल धणारे यांनी 44 हजार 849 मतं मिळवून 2014 च्या निवडणुकीत सीपीएमच्या बारक्या मंगत यांचा पराभव केला. त्यांना या निवडणुकीत 28 हजार 149 मतं मिळाली.
2014 च्या निवडणुकीत काय झालं?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत डहाणूत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामध्ये भाजप, शिवसेना, माकप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपने तिकीट नाकारल्याने माजी आमदाराच्या पुत्राचा समावेश होता. त्यावेळी भाजपचे पास्कल धनारे (44849), माकपचे बारक्या मांगात (28149) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ चौधरी (27963) यांच्यात लढत झाली होती. पास्कल धनारे यांना 16,700 मताधिक्य मिळाले होते.