(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सदाभाऊ खोतांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळं मला दुःख, राजकारणावर बोलावं पण व्यंगावर नको : छगन भुजबळ
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य मला अजिबात आवडलेलं नाही. राजकारणावर बोलावं पण व्यंगावर बोलू नये असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
Chhagan Bhujbal : सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य मला अजिबात आवडलेलं नाही. राजकारणावर बोलावं पण व्यंगावर बोलू नये. मला त्याचं दुःख झाल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे होऊ नये. त्यांची चूक झाली, पण त्यांचं असं वक्तव्य नको होतं असेही भुजबळ म्हणाले.
येवला मतदारसंघ कार्यकर्ते सांभाळत आहेत
तुम्ही येवल्यात प्रचारात दिसत नाही, याबाबत देखील भुजबळ यांना यावेळी विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, मला फक्त नारळ फोडायला बोलवलं होतं. कार्यकर्ते सांभाळत आहेत. मी राज्यातील प्रश्नांवर काम करत असल्याचे भुजबळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचा फायदा आम्हाला होईल
लाडकी बहीण योजनेबाबतही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधक बोलत होते की या योजनेमुळं अर्थशास्त्र बिघडले. पण आता विरोधकच 1500 रुपयांचे 3000 हजार रुपये करत आहेत. लोकांना आता कोणी आश्वासन देते, त्यापेक्षा पदरात किती पडत हे महत्त्वाचं आहे. आम्ही सर्वांसाठी ही योजना लागू केली आहे. आम्हला त्याचा फायदा जास्त होईल अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली. लाल संविधान रंगाच्या मुद्यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ही राज्याची निवडणूक आहे. संविधान बदलणार हे फेक नेरेटीव्ह आहे.
नेमकं काय म्हणाले होते सदाभाऊ खोत ?
सांगली जिल्ह्यातील जतमध्ये आयोजीत केलेल्या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराच्या सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे...मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा...महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी...असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं होते.
सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरातून टीका
दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. अत्यंत चुकीचं लाजीरवाण वक्तव्य असल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी जाहीर दिलगीरी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या: