Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेत जनता दलाची वाजणार 'शिट्टी', आमदार असलेल्या बहुजन विकासची नव्या चिन्हासाठी पळापळ
वसई, नालासोपारा व बोईसर येथे आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला नवीन चिन्हाचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे.
![Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेत जनता दलाची वाजणार 'शिट्टी', आमदार असलेल्या बहुजन विकासची नव्या चिन्हासाठी पळापळ Maharashtra Vidhansabha Election 2024 Election Commission Allots Whistle to Janata Dal Bahujan Vikas Aghadi to Search for New Symbol Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेत जनता दलाची वाजणार 'शिट्टी', आमदार असलेल्या बहुजन विकासची नव्या चिन्हासाठी पळापळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/02/7ca6afc04f7f0bb5dbff7f88fcdbde8e17305281021351063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिटी या चिन्हाचा वापर करता येणार नसल्यामुळे निवडणुकीसाठी इतर चिन्हाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता वसई, नालासोपारा, बोईसर मध्ये जनता दलाची शिट्टी वाजणार असून आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीला नव्या चिन्हासाठी पळापळ करावी लागणार आहे.
शिट्टी चिन्ह जनता दलासाठी राखीव
निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना ३० जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठवून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी या आशयाच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) या पक्षाने उमेदवारी दाखल न केल्याने या चिन्हाचा वापर बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा जागेसाठी केला होता.
भारत निवडणूक आयोगाने २३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये शिटी या चिन्हाचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये केल्याने निवडणूक चिन्हे (राखीव व वाटप) कायदा १९६८ मधील तरतुदीच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी या चिन्हाची मागणी केली होती. या अनुषंगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे ३१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.
अपरिचित राजकीय पक्षांना चिन्ह देण्यासंदर्भात पत्रात विनंती
या पत्रात राजकीय पक्षांसाठी राखीव चिन्हांचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करता येऊ नये असे यासंदर्भातील कायद्यात स्पष्ट तरतूद असताना शिटी या चिन्हा चा मुक्त चिन्ह यादीत समाविष्ट करण्यात आल्याकडे राज्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे लक्ष वेधण्यात आले. तसेच २६ मार्च २०१४ रोजी भारत निवडणूक आयोगाने काढलेल्या एका अन्य अधिसूचनेत अरुणाचल प्रदेश, बिहार व मणिपूर या तीन राज्यात जनता दल (युनायटेड) हा नोंदणीकृत राज्य पक्ष असल्याने या पक्षाचे “बाण” हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर शिटी हे चिन्ह राज्यातील नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन ही विनंती करण्यात आली होती.
बहुजन विकास आघाडीला नवे चिन्ह शोधणे आवश्यक
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने काल सायंकाळी तातडीने उत्तर देतना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हे चिन्ह इतर राजकीय पक्ष अथवा अपक्षांना देण्यात येऊ नये असे देखील सुचित केल्याने वसई, नालासोपारा व बोईसर येथे आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला नवीन चिन्हाचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)