(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhansabha Election 2024: महाडमध्ये भरत गोगावले यांची हॅट्ट्रिक
Mahad VidhanSabha 2024: महाड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे भरत गोगावले विजयी झाले आहेत.
Mahad VidhanSabha 2024: महाड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे भरत गोगावले विजयी झाले आहेत. भरत गोगावले यांना 1 लाख 17 हजार 442 मते मिळाली. भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला.
महाड विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना (शिंदे गट)चे भरत गोगावले आमदार आहेत. भरत गोगावले यांनी पंचायत निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास भरत गोगावलेंचा आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीकडून भरत गोगावलेंचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप यांचं नाव निश्चित मानलं जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाजी मारली. भरत गोगावले यांनी काँग्रेसचे माणिक मोतीराम जगताप यांचा पराभव करत विजय मिळवला होता. महाड मतदारसंघात एक लाखाच्या वर मते प्राप्त करून या मतदारसंघात लाख मते घेऊन विजयी होणारे पहिले उमेदवार ठरले. विजयाची हॅट्ट्रिक साधत भरत गोगावले 21 हजार 256 मतांनी विजयी झाले आहेत. सन 2009 मध्ये भरत गोगावले हे 14,050 मतांनी तर 2014 मध्ये 21,258 मतांनी विजयी झाले होते.
मंत्रिपद फिक्स होतं, पण दोन वर्षांपासून हुलकावणी-
रायगडमध्ये शिंदे गटाचे तीन आमदार असतानाही मंत्रिपद मिळाल नाही. तर नंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना मात्र मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदही देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी होती. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या ज्या वेळी चर्चा होते त्या त्या वेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद आणि रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार हे फिक्स असताना ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितलं. तेव्हापासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाची हुलकावणी सुरूच आहे. शिंदे गटाच्या नंतर सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं देण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. त्यामध्ये वाद असलेल्या रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीला मंत्री बनवलं. त्यामुळे तटकरे हे कानामागून आले आणि तिखट झाले अशी काहीशी अवस्था गोगावले यांची झाली होती.
रायगड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व-
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले होते. सध्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येतंय. कारण शिवसेनेचे तीनही आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. तर अदिती तटकरे देखील महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटासोबत आहेत.