Shriniwas Pawar : काका-पुतण्या समोरासमोर आले, जय पवार पटकन श्रीनिवास पवारांच्या पाया पडले, VIDEO व्हायरल
Shriniwas Pawar and Jay Pawar: अजित पवारांचे भाऊ आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार दिसताच, जय पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली.
बारामती: महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. काही मतदारसंघामध्ये तगडी लढत होणार आहे, काही मतदारसंघामध्ये तर एकाच कुटूंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अशा काही महत्त्वाच्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष्य लागलं आहे, त्यापैकी एक म्हणजे बारामती (Baramati). बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरूध्द पुतण्या अशी लढत होत आहे, अजित पवारांना (Ajit Pawar) युगेंद्र पवारांचं मोठं आव्हान आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांसाठी त्यांची दोन मुले जय पवार, पार्थ पवार आणि पत्नी खासदार सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघात फिरत होते तर युगेंद्र पवारांसाठी बाकी संपूर्ण कुटूंब प्रचार करत होतं, अशातच आज मतदानाच्या दिवशी आज श्रीनिवास पवार दिसताच जय पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला, त्यामुळे पवार कुटूंब राजकारणात वेगळं झालं तरी समोर आल्यावर त्यांच्यातील प्रेम दिसून आल्याच्या चर्चा सध्या बारामतीमध्ये रंगल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
आज मतदानाच्या दिवशी पवार कुटूंबातील सदस्य विविध बूथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती पाहत आहेत. अशातच अजित पवारांचे भाऊ आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार दिसताच, जय पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली. त्यानंतर ते पुढे आपापल्या कामासाठी निघून गेले. बारामती शहरांमध्ये युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार आणि जय पवार हे विविध बूथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या तसेच नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. बारामती शहरातील सिद्धेश्वर गल्ली येथे जय पवार आणि श्रीनिवास पवार समरासमोर आले असता त्यांनी एकमेकांची गळा भेट घेतल्याचं दिसून आलं आहे.
काका पुतण्या आले आमने-सामने, जय पवारांनी काका श्रीनिवास पवार समोर दिसताच वाकून केला नमस्कार अन् घेतली गळाभेट#Jaipawar #ShriniwasPawar pic.twitter.com/4jfljnpZUI
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 20, 2024
युगेंद्र पवारांनी घेतली आजीची भेट
युगेंद्र पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, काही योगायोग झाला माहिती नाही. मी आजीला भेटण्यासाठी अजित पवारांच्या घरी जायला निघालो. मी तिथे फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, आजी कन्हेरीला यायला निघाल्या आहेत, त्यामुळे मी गाडी वळवली आणि इथं आलो आजीचा आशीर्वाद घेतला आता पुढच्या कामासाठी निघालो आहे'.
'आम्ही कधी असं राजकीय बोललो नाही. कधी राजकीय बोलत नाही. तरी त्यांना सांगितलं तब्येतीची काळजी घ्या. जास्त विचार करत बसू नका, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही नका काळजी करू इतकंच आम्ही बोललो, असं युगेंद्र पवार म्हणाले. सांगता सभेतील पत्राबाबत बोलताना युगेंद्र पवार बोलताना म्हणाले, 'ते त्यांचा पत्र कोणाचं असेल काय असेल, ते मला काहीच माहित नाही, त्याच्यावर मला काहीच भाष्य करायचं नाही. बोलायचं ही नाही. पण शेवटी एका आईसाठी एका आजीसाठी सगळे समान असतात तुम्ही कुठल्याही कुटुंबात पाहिलं तर जगात आजी-आई सगळ्यांना समान वागणूक देत असतात आणि तसेच माझ्या आजीच्या बाबतीत आहे', असं युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.